आकाश नेवे / आॅनलाईन लोकमतहैदराबाद, दि. 1 - मिळालेल्या दोन जीवदानांचा फायदा कसा घ्यावा, हे डेव्हिड वॉर्नरने आज कोलकाता नाईट रायडर्सला दाखवून दिले. या सामन्यात केकेआरसाठी व्हिलन ठरला तो वॉर्नर नाही तर ख्रिस व्होक्स. व्होक्स याने दोन्ही वेळा वॉर्नरचा झेलसोडला.अव्वल स्थानावर असलेल्या केकेआरला सनरायजर्सकडून ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात सर्वात लक्षवेधी होती ती कॅप्टन्स इनिंग, वॉर्नर याने ५९ चेंडूत १२६ धावा कुटल्या. आणि गौतम गंभीरकडून पुन्हा एकदा आॅरेंज कॅप हिसकावून घेतली. सामना असो की आॅरेंज कॅप यासाठी खरी लढत केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर आणि सनरायजर्सचा वॉर्नर यांच्यातच होती. याबाजी मारली वॉर्नरने. सामन्याच्या आधीच आॅरेंज कॅपच्या शर्यतीत वॉर्नर गंभीरच्या मागे होता. मात्र या सामन्यात शतक झळकावून त्याने ही कॅप पुन्हा आपल्याकडे घेतली. आणि संघाला दोनशेच्या वर धावसंख्या उभारून दिल्यावर विजयही मिळवून दिला.आजचा दिवसच केकेआरचा नव्हता. केकेआरकडून तुफानी सलामी देणारा नरेन अपयशी ठरला. त्यानंतर कर्णधार गंभीरही गरजेच्या वेळी मोठी खेळी करु शकला नाही.उथप्पा आणि पांडे यांनी डाव सांभाळला. मात्र त्यातच पावसाच्या अडथळा आला. षटकांचे नुकसान झाले नसले तरी फलंदाज दडपणाखाली आले. पांडे बाद झाल्यावर उथप्पाने अर्धशतक झळकावले. मात्र मोहम्मद सिराजने त्याला बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला. उथप्पा बाद झाल्यावर हैदराबादचा विजय हा फक्त औपचारिकताच राहिली होती. उथप्पाने आजच्या सामन्यात चार षटकार लगावले. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत २१ षटकार लगावले आहेत. तर वॉर्नरने या सामन्यात ८ षटकार लगावले. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत तब्बल २२ षटकार लगावले. आपल्या या खेळीने षटकारांच्या यादीत उथप्पालाही मागे टाकले आहे.