- ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 22 - रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून भारताला अभिमानाचा क्षण मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचं भारतात आगमन झालं आहे. हैदराबाद विमानतळावर पी व्ही सिंधूचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भारताला पदक मिळवून देणा-या या आपल्या 'सुवर्ण'कन्येचं स्वागत करण्यासाठी सकाळपासूनच विमानतळाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. स्वागतानंतर पी व्ही सिंधू आणि प्रशिक्षक गोपीचंद यांची विजयी मिरवणूकदेखील काढण्यात आली. विजयी मिरवणूक झाल्यानंतर गछिबोबली स्टेडिअममध्ये सन्मान सोहळा पार पडणार असून तेलंगणा सरकार हा सन्मान करणार आहे.
पी व्ही सिंधूच्या विजयी रॅलीसाठी बेस्टची आन, बान, शान असलेल्या नीलांबरीला मान मिळाला आहे. निलांबरीतून विजयी मिरवणूक काढण्यात आली. पी व्ही सिंधू आणि गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी ही ओपन डबलडेकर बस पुरवण्यात यावी, अशी विनंती तेलंगणा सरकारने बेस्ट प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार, बेस्ट प्रशासनाने सिंधू आणि गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी बस पाठवण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून रविवारी सकाळी ९ वाजता नीलांबरी हैद्राबादला रवाना झाली होती.
अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या आव्हानाचा सिंधूने उत्तम प्रतिकार केला. मात्र, तिस-या व निर्णायक गेममध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला आणि सुवर्णपदक मारिनने पटकावले. सिंधूने मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे ऑलिम्पिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड (अथेन्स २00४), विजयकुमार (लंडन २0१२) आणि मल्ल सुशीलकुमार (लंडन २0१२) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत. तरीही बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकचे रौप्य पदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली.
सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरी, मेरि कोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. पण सिंधूने यापुढे जात रौप्यपदकाची कमाई केली.