ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या राजीनाम्याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं आहे. धोनीने स्वतःहून राजीनामा दिला नाही तर त्याच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव होता आणि त्याला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडलं असा खळबळजनक आरोप बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी केला आहे. रविवारी रांचीमध्ये वर्मा यांनी हा आरोप केला. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृ्त्त दिलं आहे.
वर्मांनी केलेल्या आरोपानुसार, झारखंड क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमिताभ चौधरी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील संबंध काही दिवसांपासून खराब झाले होते. चौधरी हे 2 जानेवारीपर्यंत झारखंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. नुकत्याच झालेल्या रणजी सामन्यांदरम्यान चौधरी आणि धोनीचे संबंध चांगलेच ताणले गेले.
गुजरात आणि झारखंड संघादरम्यान झालेल्या रणजी उपांत्य सामन्यात चौधरी यांनी धोनीकडे खेळण्याचा आग्रह धरला होता. मात्र, खेळण्यास नकार देत धोनीने संघासोबत मार्गदर्शक म्हणून राहण्याची तयारी दाखवली. धोनी मार्गदर्शन करत असतानाही झारखंड संघाचा या सामन्यात पराभव झाला होता. ही संधी साधून चौधरी यांनी 4 जानेवारी रोजी बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांना फोन केला आणि धोनीला त्याच्या भविष्यातील प्लानबाबत विचारणा करण्यास सांगितलं.
चौधरी यांच्या सांगण्यावरूनच प्रसाद यांनी धोनीला फोन केला आणि भविष्यातील प्लानबाबत विचारणा केली. अशी विचारणा होणे हे धोनीसाठी धक्कादायक होते. त्यामुळे धोनीने त्याचदिवशी तडकाफडक राजीनाम्याचा निर्णय घेतला.