- ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. 27 - वेस्ट इंडीजला त्यांच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-० ने नमविणारी टीम इंडिया टी 20 सामना जिंकण्याच्या हेतून मैदानात उतरली आहे. टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी मिळाल्याचा पुरेपूर फायदा घेत भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. वेस्ट इंडिजने भारतासमोर 246 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताला जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजप्रमाणेच स्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे.
वेस्ट इंडिजने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांना वरचढ होऊ दिलं नाही. ओपनिंग करणा-या चार्ल्स आणि लुईसने पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. पाचव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरच वेस्ट इंडिजच्या 50 धावा पुर्ण झाल्या होत्या. लुईसने तर फक्त 48 चेंडूत शतक पुर्ण केलं. वेस्ट इंडिजने 246 धावा केल्या आहेत. सुरुवातीला स्फोटक फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारणारे वेस्ट इंडिजचे फलंदाज शेवटच्या ओव्हर्समध्ये धावा करण्यात अपयशी ठरले. शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने आपल्या तीन विकेट्स गमावल्या. 245 धावांसोबत वेस्ट इंडिजने टी 20 मध्ये भारताविरोधातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड केला आहे.
भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. रवींद्र जाडेजा आणि बुमराहने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वरने एक विकेट घेतली.
शनिवार आणि रविवारी फ्लोरिडात दोन सामन्यांची मालिका होत असून दोन्ही संघांमधील रेकॉर्डवर नजर टाकल्यास आकडेवारीत विंडीजला झुकते माप आहे. दुसरीकडे कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ विजयी रथावर स्वार झालेला दिसतो. दोन्ही संघांत पाच टी-२० सामने झाले. त्यातील तीन विंडीजने तर २ भारताने जिंकले आहेत.
यंदा भारतात झालेल्या विश्वचषकात विंडीजकडून मुंबईत भारताला पराभवाचा धक्का बसला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया जखमी वाघाप्रमाणे तुटून पडणार आहे. भारताकडे दिग्गज खेळाडूंची उणीव नाही. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास देखील उंचावला. विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे खेळाडू झटपट प्रकारातही उपयुक्त ठरू शकतात. भारताने अलीकडे आॅस्ट्रेलिया आणि लंकेविरुद्ध टी-२० त देखणी कामगिरी केली आहे. १४ सदस्यांच्या भारतीय संघात झालेला सर्वांत मोठा बदल म्हणजे कर्णधार बदलणे हा आहे. त्यामुळे विंडीजकडून विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड यानिमित्ताने भारत करणार आहे.
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. यामुळे भारताला व्यापक पाठिंबा मिळेल. दुसरीकडे चांगल्या कामगिरीचेही दडपण राहणार आहे. धोनी आव्हान समर्थपणे पेलतो, पण गेल्या काही महिन्यांपासून तो मैदानाबाहेर होता, हे देखील नाकारता येणार नाही.