टोकियो: बेल्जियमची १८ वर्षीय वेटलिफ्टर नीना स्टेरक्सनं टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी सगळ्यांची मनं जिंकली. नीना टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलोग्राम ग्रुप एमधून उतरली होती. तिला पदक जिंकता आलं नाही. मात्र तिनं दिलेली झुंज जबरदस्त होती. अवघ्या १८ वर्षांच्या स्टेरक्सनं पदासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. मात्र तिला यश आलं नाही. याच गटात भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदकाची कमाई केली.
२०२१ युरोपियन चॅम्पियनशीपच्या माध्यमातून नीनानं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. नीनाच मुकाबला भारताची मीराबाई चानू, चीनची होऊ जिहुई आणि इंडोनेशियाच्या ऐसाह विंडी कांटिकाशी होता. नीनानं ८२ आणि ९९ किलोग्राम वजन अतिशय सहज उचललं. नीनानं पाचवं स्थान मिळवलं. नीनाच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आणि ऑलिम्पिक रेकॉर्ड्सची नोंद आहे.
शेवटच्या प्रयत्नात नीनाला १०१ किलोग्राम वजन उचलायचं होतं. तिनं संपूर्ण ताकद पणाला लावली. अंगातला सगळा जोर एकवटून तिनं प्रयत्नांची शर्थ केली. मात्र तिला यश आलं नाही. नीनाला अश्रू अनावर झाले. शेवटच्या क्षणांपर्यंत नीनानं वजन उचलण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न केला. मात्र अयपश आल्यानं अश्रूंचा बांध फुटला.
नीना ड्रेसिंग रुममध्ये जाऊनही रडत होती. तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. तिचे प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफनी तिला दिलासा दिला. १०१ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरलेल्या नीनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीना बेल्जियममधील तरुणाईची आदर्श आहे. आपल्या देशाला पदक मिळवून देण्यासाठी तिनं केलेल्या अथक परिश्रमांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.