सचिन कोरडे : आमच्या घरात खेळाचे वातावरण नव्हते. बॉक्सिंग तर खूप दूरचा विषय. बालपणी मला टीव्हीवरील अॅक्शन चित्रपट खूप आवडायचे. जॅकी चेन, अक्षय कुमार, संजय दत्त, सनी देओल या अभिनेत्यांच्या ‘फायटिंग्स’ मला खूप आवडत होत्या. त्याचा प्रभाव माझ्या जीवनावर पडला. मोहम्मद अली हे बॉक्सिंग खेळू शकतात तर मी का नाही? असा प्रश्न पडत होता. अखेर घरच्यांच्या नकळत मी बॉक्सिंगचा सराव करायचे. पुढे पुढे मी या खेळात पूर्णपणे रुळले. अॅक्शन चित्रपट पाहूनच मी बॉक्सिंग कोर्टवर उतरले, असे सहा वेळची विश्वचॅम्पियन आणि आॅलिम्पिक पदक विजेती एम. सी. मेरी कोम हिने सांगितले.
‘गोवा’ फेस्ट या कार्यक्रमांतर्गत मेरीची जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मेरीने आपली संघर्ष गाथा मांडली. मेरीचा थक्क करणारा प्रवास ऐकून अनेकजण अचंबित झाले. ती म्हणाली, मोहम्मद अली यांना टीव्हीवर पाहायची. ते त्या काळचे प्रसिद्ध बॉक्सर होते. तेव्हा एकच विचार मनात यायचा की मोहम्मद अली करू शकतात तर मी का नाही? महिला का लढू शकत नाहीत. त्यावेळी बॉक्सिंगबाबत पूर्णत: नकारात्मक वातावरण होते. अशा वातावरणात महिला बॉक्सर म्हणून येणे ही कल्पनाही न पटणारी होती. त्यात माझ्या घरात वडिलांना हा खेळ आवडत नव्हता. खूप धोकादायक खेळ असल्याने ते याची चर्चाही करीत नव्हते. मी मात्र त्यांच्या नकळत खेळत होते. पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर जिंकल्यानंतर स्थानिक वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छोटा फोटो छापून आला. तेव्हा फोटोखाली मेरी कोम असे नाव होते. मुळात माझे नाव च्युंग नई झांग असे होते. मात्र, हे नाव इतरांना अवघड जायचे त्यामुळे ते मला मेरी संबोधत होते. तेच नाव वृत्तपत्रातही आले. त्यामुळे ही माझी मुलगी नाहीच असे वडील इतरांना सांगायचे. प्रत्यक्षात जेव्हा त्यांना मी बॉक्सिंग खेळली हे समजले तेव्हा ते दु:खी झाले आणि मी मात्र चॅम्पियन. अखेर काही दिवसांनंतर त्यांना पटवून सांगण्यात मी यशस्वी ठरले.
‘लोकमत’चा ग्लोव्हज मेरीच्या हाती...सहा वेळची विश्वविजेती असलेल्या मेरी कोम हिला ‘लोकमत’तर्फे ‘ग्लोव्हज किचेन’ भेट देण्यात आले. ही छोटीशी भेटवस्तू मेरीनेही मोठ्या उत्सुकतेने स्वीकारली. नेहमी हातात मोठे बॉक्सिंग ग्लोव्हज घालणाºया मेरीला हा छोटा ग्लोव्हज खूप आकर्षक वाटला आणि भारावून जात तिने ‘ये मेरे लिए है क्या,’ असे उद्गार काढले.
टोकियो आॅलिम्पिकसाठी ११० टक्के योगदानमाझ्या जीवनातील ध्येय पूर्ण झालेले नाही. सहा वेळा विश्वचॅम्पियन जरी झाले असले तरी आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण गाठण्याचे ध्येय बाकी आहे. आगामी टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर सुवर्णपदक व्हावे, असे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी ११० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीन.कामगिरीत सातत्य राखणे सोपे नसते. परंतु, प्रयत्न करणे आपल्या हातात नक्की आहे, असेही ३६ वर्षीय मेरी म्हणाली.
आयुष्यातील सर्वात कठीण दिवस...पटीयाला येथे प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले होेते. आशियाई चॅम्पियनशीपची तयारी सुरू होती. माझा मुलगा पतीसोबत होता. तेच त्याचा सांभाळ करायचे. मुलाच्या हृदयाला छिद्र पडल्याची बातमी कानावर पडली तेव्हा शरीरातील ताकद संपल्यासारखी वाटत होती. तो क्षण खूप कठीण होता. तरीही मी सराव सोडला नाही. पतीनेच मुलाला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार यशस्वी झाले. अशा स्थितीत तुमची खूप मोठी परीक्षा असते. खेळ की कुटुंब असा प्रश्न पडत असतो. मी कुटुंबालाही तितकेच प्राधान्य देते. आज माझ्या यशात माझ्या पतीचा खूप मोठा वाटा आहे. इतरांच्या यशात स्त्रीचा असतो, येथे मात्र उदाहरण वेगळे आहे.
यशाचे रहस्य...आज युवा खेळाडू खेळालाही ग्लॅमर समजतात.राष्ट्रीय स्तरावर निवड झाली की शिबिरात सहभागी होताच प्रत्येक ठिकाणी मोबाइलवर फोटो काढायला सुरुवात करतात. माझे मात्र तसे नाही. जोपर्यंत स्पर्धा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी एकही फोटो काढत नाही. संपूर्ण लक्ष हे माझ्या सरावावर असते. मला वाटते गेल्या १७ वर्षांत देशाला नवी चॅम्पियन मिळाली नाही. त्याच्या प्रतीक्षेत मीही आहे. आता साधनसुविधा खूप आहेत; परंतु तसे खेळाडू का उपजत नाहीत, हा एक प्रश्न आहे.
मेरीचे सिंग ए सॉँग....मेरी बॉक्सिंग कोर्टवर जितकी आक्रमक आहे तितकी ती वैयक्तिक जीवनात नाही. आपली संस्कृती जपणारी, शांत आणि मनमोकळ्या स्वभावाची ती आहे. मेरीचा आवाजही चांगला आहे. आज प्रेक्षकांपुढे तिने गाणे सादर केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मेरीने इंग्रजीतील गीत सादर केले.