मेलबोर्न : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू ब्रिटनचा अॅँडी मरे याने बर्नाड टोमीचचा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयाबरोबरच त्याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर, दुसरीकडे, चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्टेन वावरिंकाला मोठा झटका बसला. मिलोस राओनिकने त्याचा पराभव केला. मरे याने १६व्या मानांकित टोमीचचा दोन तास ३० मिनिटांच्या सामन्यात ६-४, ६-४, ७-६ने पराभव केला. आता त्याचा सामना स्पेनचा आठवा मानांकित डेव्हिड फेरर याच्याशी होईल. २०१४चा चॅम्पियन वावरिंकाने दोन सेटने पिछाडीवर राहिल्यानंतर दोन सेट जिंकून पुनरागमनाचा प्रयत्न केला; मात्र राओनिकने अंतिम सेटमध्ये बाजी मारली. आतापर्यंत अपराजित राहिलेल्या राओनिकने वावरिंकाचा ३ तास आणि ४४ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-४, ६-३, ५-७, ४-६, ६-३ ने पराभव केला. फ्रेंच ओपनचा गतविजेता असलेल्या वावरिंकाविरुद्ध राओनिकचा हा ५ सामन्यांतून पहिला विजय आहे. (वृत्तसंस्था)सानिया-हिंगीस उपांत्यपूर्व फेरीतअव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने शानदार प्रदर्शन करीत आगेकूच केली आहे. त्यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर भारताच्या रोहन बोपन्ना याने सुद्धा मिश्र दुहेरीत अंतिम आठांत स्थान पक्के केले आहे. सानिया-हिंगीस या जोडीने रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोवा आणि इटलीच्या रॉबर्टा विन्सी या जोडीवर एक तास २० मिनिटांत मात केली. हा सामना त्यांनी ६-१, ६-३ ने जिंकला. दुसरीकडे, रोहन बोपन्नाने त्याचा चीनचा जोडीदार ताइपेई यंग जान चान सोबत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
वावरिंकाला झटका, मरेची आगेकूच
By admin | Published: January 26, 2016 2:41 AM