धरमशाला : आॅस्ट्रेलियन मीडिया आमच्या कर्णधाराच्या मागे हात धुऊन लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना करण्याचा प्रकारही त्यातलाच. क्रिकेटमधून लक्ष विचलित करण्यासाठी स्वस्त प्रसिद्धीचे हे प्रकार दुर्दैवी असल्याची टीका स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा याने केली.तो म्हणाला, ‘‘रांचीच्या तिसऱ्या कसोटीत पुजाराने दुहेरी शतक ठोकले. स्मिथने पुणे आणि रांचीच्या सामन्यात झुंजार खेळी केली. बंगळुरू कसोटीत आश्विन आणि नाथन लियोन यांनी अप्रतिम मारा केला. मालिकेतील या ठळक घटना निष्फळ चर्चांना ऊत आल्यामुळे मागे पडल्या आहेत. अशा प्रकारचे शाब्दिक हल्ले फारच क्लेशदायक आहेत. आम्ही विराटसोबत आहोत. खेळावरील लक्ष विचलित करण्यासाठी खोडसाळपणे काही लोक असा प्रकार घडवून आणतात; पण आमचे लक्ष मुळीच विचलित झालेले नाही.’’कोहलीसंदर्भात पुजारा म्हणतो, ‘‘विराट उत्कृष्ट कर्णधार आहे. आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. कुठल्याही गोष्टीची काळजी करण्यापेक्षा आम्ही खेळावर लक्ष देत आहोत. सध्याच्या मालिकेत उभय संघांत चुरस पाहायला मिळाली. तथापि, खेळापेक्षा इतर गोष्टींची चर्चा अधिक रंगतदार होणे दुर्दैवी असल्याचे जाणवते.’’डीआरएसप्रकरणी ड्रेसिंग रूमची मदत घेतल्याचा कोहलीने स्मिथवर आरोप करताच वादाला तोंड फुटले. स्मिथने मात्र अनवधानाने असे घडल्याचे म्हटले होते. यानंतर आॅस्ट्रेलियन मीडियाने कोहलीला टार्गेट करीत ‘शेषनाग’ आणि क्रिकेटमधील ‘डोनाल्ड ट्रम्प’ असे संबोधले. क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी कोहलीला धारेवर धरताना त्याला ‘सॉरी’चे स्पेलिंग माहिती नसावे, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)
लक्ष विचलित करण्याचा प्रकार दुर्दैवी : पुजारा
By admin | Published: March 23, 2017 11:28 PM