नवी दिल्ली : दुखापतीमुळे रियो आॅलिंम्पिक स्पर्धेतून बाहेर पडलेली भारताची बॅडमिंटन क्विन सायना नेहवाल पुन्हा मैदानावर परतण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र आपले करीअर संपण्याच्या मार्गावर आहे की काय, अशी शंका तिला वाटत आहे.सायनाने एका मुलाखतीत म्हटले आहे की, अनेकांना वाटते की माझे करीयर संपले आहे. मी पुन्हा मैदानावर उतरु शकत नाही. आता तर मला ही असेच वाटायला लागले आहे. पाहू या पुढे काय होते ते कारण भविष्याबाबत कोणीच काही सांगू शकत नाही.’लंडनमध्ये २०१२ मध्ये झालेल्या आॅलिंम्पिक स्पर्धेत कास्यंपदक पटकावणाऱ्या सायनाला रियो आॅलिंम्पिकमध्ये दुखापतीने ग्रासले होते. रियो आॅलिंम्पिकमधून बाहेर पडल्यानंर तिच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. सायना सध्या कोर्टवर सराव करत असून प्रशिक्षक विमलकुमार तिच्या पुनरागमनासाठी कोणतीही घाई करु इच्छित नाही. १५ नोव्हेंबरपासून सुुरु होणाऱ्या चायना ओपन सुपरसिरिजस्पर्धेवर सायनाचे लक्ष आहे. दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा मैदानावर उतरणे सायनासाठी सोपे असणार नाही. सायना म्हणाली, ‘मी कोणत्याही परिणामाची काळजीशिवाय सामना खेळणार आहे.’ चीनमध्ये ती मैदानावर उतरेल तेंव्हा ती शंभर टक्के तंदुरुस्त असणार नाही हे तिलाही माहित आहे. मात्र या स्पर्धेत ती आपली सर्वोत्कृष्ठ कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.सायना म्हणाली, मी माझ्या कारकिर्दीबाबत संतुष्ठ आहे. मी नंबर वन रॅँकिंग, आॅलिंम्पिक पदक, जागतिक विजेतेपद यासह सर्व महत्वाच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सध्या मी कोणतेही ध्येय समोर ठेवलेले नाही. मला फक्त तंदुरुस्तीवर लक्ष द्यायचे आहे. त्याचा परिणाम आपोआप मिळेल.
माझे करिअर संपण्याच्या मार्गावर ?
By admin | Published: November 03, 2016 4:33 AM