नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी न्या. आर.एन. लोढा समितीने सुचविलेल्या उपाययोजनांना बीसीसीआयचा विरोध नसल्याचे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांचे मत आहे.समितीने एक महिन्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना ठाकूर म्हणाले,‘सुधारणा घडवून आणण्यापासून आम्ही पळ काढणार नाही. बोर्डात सर्वच चुकीचे काम होत आहे, असेही नाही.’ विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या घोषणेनंतर लोढा समितीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ठाकूर पुढे म्हणाले, बीसीसीआयमध्ये सर्वकाही चुकीचे आहे असे मानायचे कारण नाही. १९८३ चा विश्वचषक जिंकल्यानंतर खेळाडूंना देण्यासाठी बोर्डाकडे पैसे नव्हते पण गेल्या ३०-४० वर्षांत खेळाडूंना बोर्डाने बरेच दिले.’ पारदर्शीपणा, उत्तरदायित्व आम्हालाही हवे...पारदर्शीपणा व उत्तरदायित्व पासून आम्ही पळ काढणार नाही असे सांगत ठाकूर म्हणाले, ‘सुधारणावादी मार्गानेच आमचा प्रवास सुरू आहे. सर्व राज्यांना लोढा समितीचा अहवाल पाठविला आहे. यावर ७ फेब्रुवारीला कायदा समितीच्या बैठकीत चर्चा होईल. तिसऱ्या आठवड्यात बोर्डाची आमसभा आयोजित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीपर्यंत आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडणार आहोत.’ (वृत्तसंस्था)
सुधारणांना आमचा विरोध नाही : ठाकूर
By admin | Published: February 06, 2016 3:16 AM