- महेश चेमटे, मुंबई
अनुभवी आणि बलाढ्य खेळाडू संघात नसले तरी, नव्या दमाच्या खेळाडूंसह नव्या जिद्दीने प्रो कबड्डीच्या चौथ्या सत्रात पंगा घेण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा यू मुंबाच प्रशिक्षक इ. भास्करण यांनी दिला आहे. अंधेरी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात यू मुंबा चौथ्या सत्रासाठी कशा प्रकारे सज्ज आहे, याबाबत खास ‘लोकमत’शी त्यांनी विशेष संवाद साधला.आगामी काही दिवसात पुन्हा एकदा देशात कबड्डीचे बिगुल वाजेल. यंदा झालेल्या खेळाडूंच्या लिलावाचा फायदा घेत सर्वच संघांनी आपली बाजू बळकट केली आहे. प्रत्येक संघाने आपल्या चुका सुधारुन जोरादार कंबर कसली आहे. त्यामुळेच यंदा अत्यंत अटीतटीची स्पर्धा होईल. आम्ही बचाव, चढाई, फिटनेस, कॉर्नर यांवर विशेष मेहनत घेतली असून चौथ्या सत्रासाठी पुर्णपणे सज्ज आहोत, असे भास्करण यांनी सांगितले.‘‘लिलावामध्ये ‘अ’ दर्जाचे ८ खेळाडू एकट्या यू मुंबातून गेल्याचा अभिमान आहे. इतर संघातील ‘अ’ दर्जाच्या एक किंवा दोन खेळाडूंना मागणी होती. मात्र मुंबातील तब्बल ८ खेळाडूंना इतर संघानी आपल्यात सामावून घेण्यासाठी जी उत्सुकता दाखवली, याचा प्रशिक्षक म्हणून मला अभिमान वाटतो. सध्या संघात नवीन खेळाडूंचा भरणा आहे. अनुभवी खेळाडूंशी त्यांचा ताळमेळ बसवताना ‘प्रशिक्षक’ म्हणून थोडी जास्तच मेहनत करावी लागत आहे. नवीन खेळाडू हे मेहनती असून सामना जिंकण्यासाठी त्यांच्यात सर्वस्व अर्पण करण्याची जिद्द सरावादरम्यान दिसू येत आहे. त्यामुळे संघात आनंदाचे वातावरण आहे. शिवाय जुन्या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा त्यांना निश्चितच होईल, यात शंका नाही,’’ असेही भास्करण म्हणाले.कबड्डीमध्ये कोणा एका खेळाडूमुळे संघ कधीच विजयी होत नाही. प्रत्येक खेळामध्ये कर्णधाराची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमार यंदाही चमकदार कामगिरी करेल. शिवाय नवोदित खेळाडू जोशात सराव करत असल्याने अनुपही समाधानी आहे. जुन्या खेळाडूंच्या जागी त्याच ताकदीच्या खेळाडूंची निवड केल्याने यू मुंबा संतुलित आहे.- इ. भास्करण