नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाची सध्याची कामगिरी पाहता रियो आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळण्याची शक्यता कमीच दिसते; मात्र भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक आॅल्टमेस यांच्या मते सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास भारत नक्की पदक जिंकेल.आठ वेळा सुवर्णपदक विजेता भारतीय संघ २०१२ मध्ये झालेल्या लंडन आॅलिम्पिकमध्ये १२ व्या स्थानी राहिला होता. आॅल्टमेसच्या मते भारतीय खेळाडूंनी जर आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, तर आॅलिम्पिकमध्ये पदक निश्चित मिळू शकते.आॅल्टमेस म्हणाले, ‘आमच्याकडे असा संघ आहे, की जो पदक मिळवू शकतो. फक्त योग्य वेळी योग्य गोष्टी करायला हव्यात. हा संघ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यास उत्सुक आहे.’ ते म्हणाले, ‘मी प्रत्येक सामन्यागणिक रणनीती बनवतो. सध्या माझे लक्ष्य पहिला टप्पा पार करणे इतकेच आहे. उपांत्य फेरीत गेल्यानंतर पुढील सामन्याचा मी विचार करीन. त्यानंतर फक्त तीन सामने जिंकायचे आहेत.’भारताला माजी विजेता जर्मनी, नेदरलॅँड, पॅन अमेरिका चषक विजेता अर्जेंटिना, आयर्लंड, कॅनडाच्या गटात ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या गटात आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, ब्रिटन, न्यूझीलंड व स्पेनचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
आम्ही पदकाचे दावेदार : आॅल्टमेस
By admin | Published: May 11, 2016 2:44 AM