ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २१ - बांग्लादेशविरुद्धचा सामना भारत पंचांच्या एतकर्फी निर्णयांमुळेच जिंकला असा आरोप आता बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही केला आहे. याआधी आयसीसीचे बांग्लादेशी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनीही असेच वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. जर पंचांनी चुका केल्या नसत्या तर भारत बांग्लादेशला हरवू शकला नसता असं हसीना म्हणतात.
भारत बांग्लादेश दरम्यानची मॅच फिक्स होती की काय असं सुचवताना कमाल यांनी शुक्रवारी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच विचारही व्यक्त केला होता. आयसीसीच्या पुढील बैठकीच्यावेळी हा मुद्दा ते मांडणार असून अंपायर्सनी दिलेले निकाल आधीच ठरवल्यासारखे वाटल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आयसीसीच्या बैठकीत आपण आपली बाजू मांडू आणि नंतर गरज वाटल्यास राजीनामा देऊ असे कमाल यांनी म्हटले आहे. बांग्लादेशचा भारताने १०९ धावांनी पराभव केल्यानंतर बांग्लादेशमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आणि पंचांच्या सुमार कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. बांग्लादेशचा फलंदाज महमुद्दुल्लाहचा झेल शिखर धवनने सीमारेषेनजीक पकडला, त्यावेळी त्याचा पाय रोपला लागल्याचा दावा बांग्लादेशप्रेमींनी केला आहे. तर रोहीत शर्मा ९० धावांवर असताना झेलबाद झाला होता, परंतु तो चेंडू नोबॉल ठरवण्यात आला. रोहीतने नंतर शतक झळकावले होते. बांग्लादेशच्या इतिहासातील तो सर्वात मोठा सामना होता आणि संपूर्ण देश त्याकडे डोळे लावून बसला होता. मात्र, बांग्लादेश हरल्यानंतर या पंचांच्या चुकांमुळेच तो हरल्याची भावना व्यक्त होत असून मुस्तफा कमाल व शेख हसीना दोघेही त्याच मताला आले आहेत.
याला असलेला आणखी एक पदर म्हणजे या सामन्यातील एक पंच आलीम दार होते, जे पाकिस्तानचे असून बांग्लादेशाच्या द्वेषापोटी त्यांनी भारताला अनुकूल अंपायरिंग केल्याचा बांग्लादेशींचा आक्षेप आहे. या सामन्याचे पडसाद बांग्लादेशमधल्या वृत्तपत्रांमध्येही उमटले आहेत. एका वृत्तपत्राने वादग्रस्त निर्णयांना वाघ बळी पडले असा मथळा दिलाय तर दुस-या एका वृत्तपत्राने पंचांच्या हेराफेरीमुळे स्वप्नवत वाटचाल भंगल्याचा मथळा दिला आहे.