लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाची स्थिती अधिक खालावत आहे. सोमवारी रात्री बांगलादेशविरुद्धच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे निकाल शक्य झाला नाही. आता आॅस्ट्रेलिया संघाला आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी अडचण भासत आहे. विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथलाही याची चांगली कल्पना आली आहे. आता स्मिथची नजर यजमान संघाविरुद्ध शनिवारी होणाऱ्या लढतीवर केंद्रित झाली आहे. या लढतीबाबत बोलताना आॅस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणाला, ‘स्पर्धेचे समीकरण निश्चित झाले आहे. गटसाखळीतील अखेरच्या लढतीत यजमान इंग्लंडविरुद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे.’ दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाल्यामुळे आॅस्ट्रेलियाच्या खात्यावर दोन गुणांची नोंद आहे. त्यांच्यासाठी इंग्लंडविरुद्ध बर्मिंघममध्ये होणारी अखेरची लढत ‘करा अथवा मरा’ अशी राहील.पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या लढतीत आॅस्ट्रेलिया न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य पराभवापासून बचावला तर बांगलादेशविरुद्धच्या लढतीत संभाव्य विजयापासून त्यांना वंचित राहावे लागले, हे विशेष.पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही सामन्यांत निकाल शक्य न होणे निराशाजनक आहे. वातावरणावर कुणाचेच नियंत्रण नसते. आता इंग्लंडचा पराभव करीत स्पर्धेतील आव्हान कायम राखता येईल. बांगलादेशविरुद्ध आम्हाला चांगली संधी होती, पण वातावरणामुळे ते शक्य झाले नाही. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये मैदानावरील कर्मचाऱ्यांनी अधिक उत्साह दाखवायला हवा, पण हा सर्व खेळाचा भाग आहे. - स्टिव्ह स्मिथ
आमच्यापुढे केवळ विजयाचा पर्याय
By admin | Published: June 07, 2017 1:07 AM