नवी दिल्ली : हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील कथुरा व रिंढाणा या दोन गावांमध्ये क्रिकेट, फुटबॉल किंवा टेनिस हे खेळ खेळणे दूर, पण तिथे हे खेळ पाहिलेही जात नाहीत. या ठिकाणी केवळ एकच खेळ खेळला जातो, तो म्हणजे ‘कबड्डी’. म्हणूनच तर सध्या प्रो-कबड्डी लीगमध्ये या दोन गावांतील ‘नरवाल’ नावाच्या खेळाडंूनी आपला दबदबा निर्माण केला आहे. बंगळुरु बुल्स, जयपूर पिंक पँथर्स व पटना पायरेट्स या संघामध्ये मिळून एकूण १० ‘नरवाल’ चमक दाखवत असून, हे सर्व जण कथुरा व रिंढाणा येथील आहेत. याविषयी पटना पायरेट्सचा हुकमी खेळाडू संदीप नरवाल याने ‘लोकमत’शी विशेष चर्चा केली.कथुरा व रिंढाणा हे पूर्वी एकच गाव होते. आमच्याकडे कबड्डीशिवाय दुसरा कोणताच खेळ होत नाही. क्रिकेट, फुटबॉलसारखे खेळ खेळणे सोडा, कोणी बघतही नाही. गावातील प्रत्येक मुलगा कबड्डी मैदानावर येतो. जर तो यामध्ये अयशस्वी झाला, तर तो अभ्यासाकडे वळतो, पण गावात कोणीही असा सापडणार नाही, जो कबड्डी खेळला नाही, असे संदीप अभिमानाने म्हणतो.गावातील कबड्डीविषयी संदीप म्हणाला, ‘कोणत्याही स्पर्धेआधी नरवाल विरुद्ध नरवाल असे सामने होतात. त्यानंतर एक संघ निवडला जातो. पहिल्या आशियाई स्पर्धेत आमच्या गावातून ओ. पी. नरवाल भारताकडून खेळले होते, तेव्हापासून गावातून राष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत. गावाने आतापर्यंत सुमारे ३० हून अधिक खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत.’ त्याचप्रमाणे, ‘सध्या प्रो-कबड्डीमुळे टीव्हीवर गावातील मुले झळकत असल्याने, कबड्डीची क्रेझ अजूनच वाढली आहे. सामन्याच्या वेळेला प्रत्येक जण टीव्हीसमोर बसलेला असतो,’ असेही संदीप म्हणाला. (क्रीडा प्रतिनिधी)प्रो-कबड्डीमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. पूर्वी आमची ओळख गावापुरती होती, पण आता परिस्थिती बदलली आहे. आज प्रत्येक ठिकाणी जाताना सांभाळून जावे लागते. चेहरा बघून लोक आम्हाला लगेच ओळखतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बिनधास्त फिरता येत नाही. - संदीप नरवाल
आम्ही फक्त कबड्डी खेळतो - नरवाल
By admin | Published: February 28, 2016 12:55 AM