बेंगळुरू : काही दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली असली तर दक्षिण आफ्रिका संघ मजबूत आहे, पण २ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असलेल्या मालिकेत आमचा आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर राहील, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली. निवृत्ती स्वीकारणाऱ्या जॅक कॅलिससारख्या खेळाडूच्या अनुपस्थितीत भारत दौऱ्यावर येत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले,‘हा प्रश्न सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे यांच्याविना खेळणाऱ्या भारतीय संघाबाबत विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आहे. खेळाडू येतात आणि जातात, वर्तमानाचा आदर करणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिका संघ जगात अव्वल स्थानावर आहे.’शास्त्री पुढे म्हणाले,‘दक्षिण आफ्रिका मजबूत संघ आहे. विदेशात ते अन्य क्रिकेट संघांच्या तुलनेत चांगली कामगिरी करतात, असा अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, याची कल्पना आहे. दक्षिण आफ्रिका संघाबाबत आदर आहे, पण त्यामुळे आम्ही आमच्या आक्रमक शैलीला मुरड घालणार नाही.’दक्षिण आफ्रिका संघ दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका होणार आहे. उभय संघांदरम्यान धर्मशाला येथे २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याने होणार आहे.महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशविरुद्ध जून महिन्यात आयोजित वन-डे मालिकेनंतर संघाचे नेतृत्व केलेले नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान संघाचे नेतृत्व करताना त्याला अडचण भासेल का, याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले,‘नाही, काही अडचण भासणार नाही. तुम्हा एका अनुभवी खेळाडूबाबत बोलत आहात. धोनी महान खेळाडूंपैकी एक आहे. तो केवळ भारतच नाही तर विश्वक्रिकेटमधील सर्वकालिक महान खेळाडूंपैकी एक आहे. धोनीला नेतृत्वाचा अनुभव आहे.’शास्त्री पुढे म्हणाले, ‘धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल. फलंदाजी क्रमाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार धोनीचा आहे. धोनी सध्या खेळाचा आनंद घेत आहे. त्याने अनेक वर्षांपासून या खेळासाठी मेहनत घेतली आहे.’ (वृत्तसंस्था)
आम्ही तुल्यबळ खेळ करू : शास्त्री
By admin | Published: September 26, 2015 12:07 AM