ऑनलाइन लोकमतबेंगळुरू, दि. २९ : कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी यंदाचे सत्र अत्यंत व्यस्त आहे. त्यादृष्टीने युवा खेळाडूंमधून कसोटीपटू घडविणे आपल्यापुढील अवघड आव्हान असेल असे मत नवनियुक्त कोच अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.वर्षभरासाठी कोचपद सांभाळल्यानंतर बुधवारी बोलविलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत कुंबळे म्हणाले,‘कसोटी क्रिकेट भक्कम करण्यास माझे प्राधान्य असेल. जे खेळाडू गेल्या काही महिन्यात अनेक टी-२० सामने खेळले त्यांना कसोटीसाठी तयार करणे हे माझ्यापुढील मोठे आव्हान असेल. चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे वळविणे माझ्याइतकीच भारतीय संघाची जबाबदारी असेल. हा प्रकार अधिक रोमहर्षक झाल्यास चाहते कसोटी क्रिकेटकडे परत येतील.’ कुंबळेंची पहिली असाईनमेंट वेस्ट इंडिज दौरा ही आहे. या दौºयात भारतीय संघ मालिका जिंकेल, असा आशावाद व्यक्त करीत कुंबळे पुढे म्हणाले,‘विंडीज दौ-यासाठी आम्ही सज्ज आहोत. विंडीजमधील खेळपट्ट्या भारतासारख्याच आहेत.
विंडीज संघ मर्यादित षटकांच्या सामन्यात भक्कम असला तरी आम्ही कसोटीत त्यांना पराभूत करू अशी आशा आहे. कसोटी मालिका विजय हे आमचे ‘टार्गेट’ राहील. भारतीय संघातील चार खेळाडू आधी विंडीज दौºयावर गेले आहेत. याशिवाय अनेकजण भारतीय अ संघातून विंडीजमध्ये खेळले. प्रतिभावान खेळाडू दौºयात स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करतील, इतके सांगू शकतो. ईशांत शर्मा, मुरली विजय, विराट कोहली, लेग स्पिनर अमित मिश्रा या सर्वांनी प्रभावी कामगिरी केली होती.संघाचे सहा दिवसांचे तयारी शिबिर जोरात सुरू आहे. सध्या वेगवान गोलंदाजीकोच नसल्याने गोलंदाजांसाठी स्वत: वेगळे शिबिर आयोजित करण्याची तयारी‘जम्बो’ने दाखविली. कुंबळे आठ वर्षानंतर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये परतले आहेत.
ते पुढे म्हणाले,‘मी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोन्ही कर्णधारांसोबत चर्चा केली. आम्ही जिंको अथवा हरो पण कर्णधारांना माझा संपूर्ण पाठिंबा राहील. सर्वच खेळाडूंमध्ये क्षमता असल्याने मी पडद्यामागून सर्वांना ताकद देणार आहे. ज्या संघासोबत मी खेळलो तेव्हाचा संघ आणि सध्याचा संघ यात कमालीची तफावत आहे. सध्याच्या टीममधील खेळाडूंचेवय सरासरी २५ आहे. फिल्डिंगमध्ये सध्याच्या संघात प्रतिभवान खेळाडू असून हे खेळाडू अष्टपैलू कामगिरी करू शकतात. युवा खेळाडूंनी लहान वयात बरेच काही मिळविले. विराटकडे ४० तर ईशांतकडे ६० कसोटी सामने खेळण्याचा अनुभवआहे. आयपीएलमध्ये मी स्वत: युवा खेळाडूंसोबत वेळ घालविला असल्याने दडपणातकसा संयम पाळायचा याचे धडे देणार आहे.’(वृत्तसंस्था)
खेळाडूंपेक्षा कुणी मोठे नाही!कोचपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रीकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते. या मुद्याला फार महत्त्व न देता कुंबळे यांनी संघबांधणीत खेळाडू सर्वांत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. कोच बनल्यानंतर मी सर्वांत आधी रवी शास्त्री यांना फोन केला. त्यांच्या अनुभवाचा लाभ मला होणार आहे. भारतीय संघाने तिन्ही प्रकारात वर्चस्व गाजवावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे.मी देखील या भूमिकेत स्थायी नाही. उद्या अन्य कुणी माझे स्थान घेणार आहे. माझ्याकडे जी संधी उपलब्ध आहे त्याचे सोने करणे ही जबाबदारी स्वीकारावीच लागेल, असे कुंबळेने स्पष्ट केले.