सचिन भोसले
कोल्हापूर : कुस्ती व वेटलिफ्टिंग या खेळांच्या वजनी गटांमध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल केले आहेत. त्यानुसारच तालुका ते राज्यस्तरावरील स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे १४ वर्षांखालील वजनगटात दोन जादा वजनगटांची भर पडली आहे. त्यामुळे वरिष्ठ गटात आता जादा खेळाडूंना स्थान मिळणार आहे. यासह जागतिक शालेय स्पर्धेच्या नियमावलीप्रमाणे वजनी गट निर्माण करता येणार आहेत.विद्यार्थ्यांचा खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीकडे ओढा वाढावा, याकरिता केंद्र आणि राज्य सरकारचे क्रीडा खाते कार्यरत आहे. त्यानुसार नियमावलीत बदल करून जास्तीत जास्त खेळाडू स्पर्धांत सहभागी व्हावेत, याकरिता कुस्ती व वेटलिफ्टिंग शालेय स्पर्धांतील वजनीगटात बदल केले आहेत. यापूर्वी काही वजनीगटांत कुस्ती स्पर्धा नसल्याने अनेकांना तितके वजन वाढवावे लागत होते.
१४ वर्षांखालील वयोगटात यापूर्वी आठ वजनी गट होते, तर त्यांत वाढ करून १० वजनी गट निर्माण केले आहेत. या नियमाचा फायदा प्रत्येकी दोन मुले, मुलींना होणार आहे. यासह २० वर्षांखालील वयोगटात खेळल्यानंतर खेळाडूला थेट वरिष्ठ गटात खेळावे लागत होते.
आता मात्र, नव्या नियमानुसार २३ वर्षांखालील वयोगट निर्माण केला आहे. या नव्या बदलाची माहिती भारतीय शालेय खेल प्राधिकरणाने राज्य क्रीडा व युवा संचालनालयाला दिली. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांना नवीन बदलाचे आदेश लागू करण्यात आले.या बदललेल्या नियमांची माहिती भारतीय शालेय खेळ महासंघाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांना दिली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा कार्यालयांना या नवीन बदलांनुसार स्पर्धा घेण्यास सांगण्यात आले आहे. पूर्वीच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून, नव्या नियमानुसार आता राज्यभरात स्पर्धा होणार आहेत.नवे कुस्ती वजनी गट असे१४ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धा (फ्रीस्टाईल) - ३५, ३८, ४१, ४४, ४८, ५२, ५७, ६२, ६८, ७५; तर मुलींमध्ये ३०, ३३, ३६, ३९, ४२, ४६, ५०, ५४, ५८, ६२ किलोगटांत होणार आहेत; तर १७ वर्षांखालील मुलांचा वजनीगट - (फ्रीस्टाईल व ग्रीको) ४१ ते ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२ , ११० किलो, तर मुलींमध्ये फ्रीस्टाईल वजनीगट - ३६ ते ४०, ४३, ४६, ४९, ५३, ५७, ६१, ६५, ६९, ७३ किलोगट असे आहेत. १९ वर्षांखालील फ्रीस्टाईलमध्ये मुले - ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७, १२५ किलो; तर मुलींमध्ये ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२, ७६ किलोगट, तर ग्रीको रोमन मुले - ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७, १३० किलो .
वेटलिफ्टिंगचे नवे वजनीगट असे१७ वर्षांखालील मुले वजनीगट - ४९, ५५, ६१, ६७, ७३, ८१, ८९, ९६ व ९६ किलोंवरील गट; मुलींमध्ये ४०, ४५, ४९, ५५, ५९, ६४, ७१, ७६ व त्यावरील गट; १९ वर्षांखालील वजनीगट मुले - ५५, ६१, ६७, ७३, ८१, ८९, ९६, १०२ व त्यावरील किलोगट; मुलींमध्ये ४५, ४९, ५५, ६४, ७१, ७६, ८१, ८७ व त्यावरील किलोगटात स्पर्धा होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांनंतर क्रीडा खात्याने हा चांगला बदल करून कुस्तीगीरांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ अनेक कुस्तीपटूंना होईल.- रामचंद्र सारंग,ज्येष्ठ कुस्तीगीर व प्रशिक्षक
नव्या बदलानुसार जास्तीत जास्त शालेय वेटलिफ्टिरना लाभ होईल. यासह पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचाही समावेश शालेय स्पर्धेत करावा.- बिभीषण पाटील, ज्येष्ठ प्रशिक्षक, वेटलिफ्टिंग
वयोगटांमध्ये जादा दोन वजनीगट निर्माण झाल्याने १२ अधिकच्या खेळाडूंना त्याचा लाभ होणार आहे. या बदललेल्या नियमावलीची माहिती पंच, प्रशिक्षकांना शिबिराद्वारे दिली जाईल.- चंद्रशेखर साखरे,जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर