फुकेट (थायलंड) : टोकियो ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानू हिने सोमवारी येथे आयडब्ल्यूएफ विश्वचषक भारोत्तोलन स्पर्धेत ४९ किलो वजन गटात तिसऱ्या स्थानावर राहून पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. तिसरे ऑलिम्पिक खेळण्याचा मान पटकावणारी मीराबाई पॅरिसमध्ये एकमेव भारतीय महिला भारोत्तोलक असेल.
जखमी झाल्याने सहा महिन्यांनंतर पोडियमवर परतलेल्या मीराबाईने एकूण १८४ किलो (८१ किलो स्नॅच तसेच १०३ किलो क्लीन ॲन्ड जर्क) वजन उचलले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ही अखेरची आणि अनिवार्य पात्रता स्पर्धा आहे. आपली स्पर्धा पूर्ण करताच मीराबाईने पॅरिस ऑलिम्पिकचे मानदंड पूर्ण केले. ऑलिम्पिक खेळण्यासाठी स्पर्धकांनी किमान दोन अनिवार्य स्पर्धा तसेच तीन पात्रता स्पर्धा खेळणे गरजेचे असते. २०१७ ची विश्वविजेती मीराबाई ४९ किलो गटात ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत चीनची जियान हुईहुआ हिच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. पात्र ठरलेल्यांची अंतिम यादी स्पर्धा आटोपताच अपडेट होईल. प्रत्येक वजन गटात आघाडीचे १० भारोत्तोलक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतील. मीराबाईने मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता.
त्यावेळी ती जखमी झाली. ती पाच वेळा वजन उचलण्यात यशस्वी तर ठरली, मात्र सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकली नव्हती. २९ वर्षांच्या मीराबाईला स्नॅचमध्ये स्वत:ची सर्वोत्कृष्ट अशी ८८ किलो वजन उचलण्याची कामगिरी करता आलेली नव्हती.