नवी दिल्ली : भारतीय भारोत्तोलक संजिता चानूविरुद्ध लावण्यात आलेले डोपिंगचे आरोप आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने (आयडब्ल्यूएफ) फेटाळून लावले आहेत. चानूच्या डोपिंग नमुन्यांमध्ये एकरूपता न आढळल्याचे कारण देत हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या चानूने आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपाबद्दल माफी तसेच झालेल्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे.
जागतिक डोपिंगविरोधी संस्थेच्या (नाडा) शिफारशींच्या आधारे ‘आयडब्ल्यूएफ’ने डोपिंगचे आरोप फेटाळण्याचा निर्णय घेतला. २६ वर्षीय चानू या प्रकरणी सुरुवातीपासून स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत होती. ‘आयडब्ल्यूएफ’चे कायदा सल्लागार लीला सागी यांचे हस्ताक्षर असलेल्या ई-मेलद्वारे चानूला अंतिम निर्णयाची माहिती देण्यात आली. ई-मेलमध्ये म्हटले आहे की, ‘वाडा’ने केलेल्या शिफारशीनुसार नमुन्याच्या आधारे खेळाडूविरुद्धचे प्रकरण समाप्त करायला हवे. ‘आयडब्ल्यूएफ’ने २८ मे रोजी ‘वाडा’ला सांगितले होते की, चानूच्या नमुन्यांमध्ये विश्लेषणादरम्यान साम्य आढळले नाही.’‘आयडब्ल्यूएफ’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘यानंतर आयडब्ल्यूएफने या खेळाडूविरुद्धचे आरोप रद्द करण्याचा आणि हे प्रकरण येथेच संपविण्याचा निर्णय घेतला.’ या प्रकरणी चानूने मणिपूर येथून वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, ‘या निर्णयानंतर मी खूप खूश आहे. अखेर डोपिंगच्या आरोपातून माझी अधिकृतपणे सुटका झाली. मात्र यादरम्यान माझ्या हातून अनेक संधी निसटल्या त्याचे काय? ज्या मानसिक त्रासाचा मी सामना केला, त्याची जबाबदारी कोण घेणार?’ संजिता चानू हिने पुढे म्हटले आहे की, ‘प्रत्येक स्तरावर झालेल्या चुकीची जबाबदारी कोण घेणार? अंतिम निर्णय येण्याआधीच एका खेळाडूला अनेक वर्षे निलंबित केले जाते आणि एक दिवस ई-मेलद्वारे कळविण्यात येते की, तुमची आरोपातून सुटका झाली आहे.’ (वृत्तसंस्था)ही एक प्रकारची चेष्टा नाही का? ‘आयडब्ल्यूएफ’ला खेळाडूंच्या कारकिर्दीची कोणतीच काळजी नाही का? माझ्या हातून आॅलिम्पिकची संधी निसटून जावी, हीच ‘आयडब्ल्यूएफ’ची इच्छा होती का? आॅलिम्पिक पदक हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. कमीतकमी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे लक्ष्य खेळाडू बाळगतात. ही संधी ‘आयडब्ल्यूएफ’ने माझ्याकडून हिसकावून घेतली. यासाठी ‘आयडब्ल्यूएफ’ने माफी मागून स्पष्टीकरण द्यावे. त्यासाठी झालेल्या नुकसानासाठी भरपाई मिळण्याबाबत मी अपीलही करणार आहे. - संजिता चानू