पूनम यादवने रविवारी भारोत्तोलनमध्ये महिलांच्या ६३ किलो वजन गटात एकूण २०२ किलो वजन पेलताना कांस्यपदकाचा मान मिळविला. राष्ट्रकुल स्पर्धेत भारोत्तोलनमध्ये भारताचे हे सातवे पदक ठरले. यंदा सुरुवातीला ज्युनिअर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविणाऱ्या पूनमने गतचॅम्पियन ओबियोमा ओकोली व ओलेयुवाटोयिन अदेसनमी यांना कडवी झुंज दिली; पण नायजेरियन स्पर्धकांनी भारतीय खेळाडूच्या तुलनेत पाच किलो वजन अधिक उचलण्याची कामगिरी केली. अदेसनमी व ओकोली यांनी प्रत्येकी २०७ किलो वजन उचलले, पण अदेसनमी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. अदेसनमीचे वजन गतचॅम्पियनच्या तुलनेत एक किलो कमी (६२ किलो) होते. पूनमची स्नॅच व क्लिन अॅण्ड जर्कमध्ये सर्वोत्तम कामगिरी तिसऱ्या प्रयत्नात झाली.तिने ८५ किलोपासून सुरुवात करताना स्नॅचमध्ये अखेर ८८ किलो वजन उचलले. क्लिन अॅण्ड जर्कमध्ये १९ वर्षीय पूनमने ११०, ११४ आणि ११७ किलो अशी सरस कामगिरी केली. अन्य एक भारतीय भारोत्तोलक वंदना गुप्ता हिला या स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने १९८ किलो वजन उचलले.
वेटलिफ्टिंग : पूनम यादवला कांस्य
By admin | Published: July 28, 2014 3:46 AM