नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द होणार असल्याची घोषणा करून देशात खळबळ माजवली असताना क्रिकेटविश्वात मात्र मोदींच्या या निर्णयाचे दमदार स्वागत केले आहे. सध्या सोशल नेटवर्किंगवर धमाकेदार कामगिरी करणाऱ्या वीरेंद्र सेहवागपासून भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळेपर्यंत सर्वांनीच या निर्णयाचे कौतुक केले आहे.काळ्या पैशांविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राइक’ मानले जात असलेल्या या निर्णयाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. परंतु, सेहवाग, हरभजनसिंग आणि कुंबळे यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.भारताचा सर्वात यशस्वी आॅफस्पिनर हरभजनसिंगनेही आपल्या स्टाइलमध्ये कमेंट केली, ‘हा होता षटकार... नरेंद्र मोदीजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करून काळ्या पैशांविरुद्ध लढण्याचे हे पाऊल खूप धाडसाचे आहे.’ सेहवागने आपल्या खास अंदाजामध्ये म्हटले, ‘अमेरिकेमध्ये लोक व्होट मोजत आहेत, तर इंडियामध्ये लोक नोट मोजत आहेत.’ तसेच, ‘आज अशा घरांवर लक्ष ठेवा, ज्यांची लाईट रात्री बंद झाली नाही. तिथे नोटा मोजण्याचे काम सुरू असणार,’ असेही सेहवागने मिश्किलपणे सांगितले. प्रशिक्षक कुंबळे म्हणाले, ‘ही पंतप्रधानांनी टाकलेली जबरदस्त गुगली आहे. वेल डन सर. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे.’ तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले, ‘काळा पैसा ठेवणाऱ्यांसाठी काळा दिवस. भारत भ्रष्टाचाराविरुद्ध लढा आणि देशाला बदला.’
मोदींच्या निर्णयाचे क्रिकेटविश्वात स्वागत
By admin | Published: November 10, 2016 4:19 AM