ऑनलाइन लोकमत
किंग्सटन, दि. 10 - वेस्ट इंडिजचा खेळाडू इविन लेव्हिसच्या शानदार फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाजांची पुरती दमछाक उडाली. भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 18.3 षटकांत 9 गडी राखून 194 धावा करत विजय साजरा केला आहे. भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करत लेव्हिसने 62 चेंडूंमध्ये शतक पार करत नाबाद 125 धावांची खेळी केली. लेव्हिसनं जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर 6 चौकार आणि 12 षटकार लगावले आहेत. लेव्हिस आणि सॅम्युअलनं 112 धावांची नाबाद भागीदारी केली. घरच्या मैदानावरच ख्रिस गेलला कुलदीप यादवने धोनीकरवी झेलबाद केले. सलामीवीर लेव्हिसनं भारतीय गोलंदाजीवर आक्रमण केले आणि विजय खेचून आणला. लेव्हिसने भारताच्या हरेक गोलंदाजांवर हल्ला चढवला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बळी जाता जाता वाचलेल्या लेव्हिसनं संधीचं सोनं केलं.
कोहली आणि धवनने चांगली सुरुवात केली होती. कोहली आणि धवन यांची जोडी विंडीजनं फोडून काढल्यानंतर पंत-कार्तिक जोडीनेही विंडीजच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. तिसऱ्या विकेटसाठी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांनी 86 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुन्हा भारताची सामन्यावरची पकड ढिली पडली. धोनी, पंत, केदार जाधव लागोपाठ बाद झाल्यामुळे भारताची दैन्यावस्था झाली. त्यामुळे भारतीय संघानं मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. जडेजा आणि आश्विनने अखेरच्या षटकांमध्ये शानदार खेळी करत भारताला 190 धावांपर्यंत मजल मारून दिली.
>संक्षिप्त धावफलकभारत :- विराट कोहली झे. नरेन गो. विलियम्स ३९, शिखर धवन धावबाद २३, ऋषभ पंत झे. वालटन गो. टेलर ३८, दिनेश कार्तिक त्रि. गो. सॅम्युअल्स ४८, महेंद्रसिंग धोनी झे. सॅम्युअल्स गो. टेलर ०२, केदार जाधव झे. नरेन गो. विलियम्स ०४, रवींद्र जडेजा नाबाद १३, रविचंद्रन अश्विन नाबाद ११. अवांतर (१२). एकूण २० षटकांत ६ बाद १९०. गोलंदाजी : बद्री ४-०-३१-०, टेलर ४-०-३१-२, विलियम्स ४-०-४२-२, ब्रेथवेट २-०-२६-०, नरेन ३-०-२२-०, सॅम्युअल्स ३-०-३२-१.वेस्ट इंडिज :- ख्रिस गेल झे. धोनी गो. कुलदीप १८, एव्हिन लेव्हिस नाबाद १२५, मार्लोन सॅम्युअल्स नाबाद ३६. अवांतर (१५). एकूण १८.३ षटकांत १ बाद १९४. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-२७-०, अश्विन ४-०-३९-०, शमी ३-०-४६-०, कुलदीप ४-०-३४-१, जडेजा ३.३-०-४१-०.