श्रीलंका पराभूत : फ्लेचर, बद्री यांची निर्णायक कामगिरीबंगळुरू : सॅम्युअल बद्रीचा सुरेख स्पेल आणि त्यानंतर आंद्रे फ्लेचरची नाबाद ८४ धावांची खेळी या बळावर वेस्ट इंडीजने विद्यमान चॅम्पियन्स श्रीलंकेवर वर्ल्ड ट्वेंटी-२० सामन्यात सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे वेस्ट इंडीजचा संघ त्यांच्या गटातील गुणतालिकेत २ विजयांसह अव्वल स्थानी आहे.फ्लेचरच्या ६४ चेंडूंतील ६ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ८४ धावांच्या खेळीच्या बळावर वेस्ट इंडीजने श्रीलंकेने दिलेले १२३ धावांचे लक्ष्य १८.२ षटकांत ३ गडी गमावून १२७ धावा करीत पूर्ण केले. आंद्रे रसेल ८ चेंडूंत २० धावांवर नाबाद राहिला. फ्लेचर आणि रसेलने ५.३ षटकांत चौथ्या गड्यासाठी नाबाद ५५ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेकडून लेगस्पिनर जेफ्रे वांडरसे याने ११ धावांत १ गडी बाद केला. अन्य गोलंदाज आपला ठसा उमटवू शकले नाहीत. मिलिंद श्रीवर्धनेने ३३ धावांत २ गडी बाद केले.त्याआधी बद्री (१२ धावांत ३ बळी) आणि ड्वेन ब्राव्हो (२० धावांत २ बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ थिसारा परेरा (४०) याच्या झुंजार खेळीनंतरही ९ बाद १२२ पर्यंतच मजल मारू शकला. डावखुरा फिरकी गोलंदाज सुलेमान बेन यानेदेखील सुरेख गोलंदाजी करताना ४ षटकांत फक्त १३ धावा दिल्या; परंतु त्याला बळी मात्र घेता आला नाही. वेस्ट इंडीजचा दोन सामन्यांतील हा सलग दुसरा विजय ठरला, तर श्रीलंकेचा दोन सामन्यांतील हा पहिला पराभव ठरला.ख्रिस गेल श्रीलंकेच्या डावादरम्यान स्नायूदुखीमुळे काहीवेळासाठी मैदानाबाहेर गेला. फलंदाजीसाठी जाताना पंचांनी त्याला रोखले. तथापि, फ्लेचरने त्याची उणीव भासू न देता वेस्ट इंडीजला वादळी सुरुवात करून दिली. त्याने अँजोलो मॅथ्यूजच्या पहिल्या षटकात चौकार आणि षटकार ठोकल्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथलादेखील षटकार व चौकार मारत त्यांचा समाचार घेतला. त्याच्या स्फोटक खेळीने वेस्ट इंडीजचा विजय सुकर झाला.संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : २० षटकांत ९ बाद १२२. (थिसारा परेरा ४०, अॅन्जोलो मॅथ्यूज २०, चांदीमल १६. बद्री ३/१२, ब्राव्हो २/२0, ब्रेथवेट १/३६).वेस्ट इंडीज : १८.२ षटकांत ३ बाद १२७. (आंद्रे फ्लेचर ८४, रसेल नाबाद २0. मिलिंद श्रीवर्धने २/३३, जेफ्रे वांडरसे १/११).
विंडीजचा सलग दुसरा विजय
By admin | Published: March 21, 2016 2:29 AM