कराची : पाकिस्तानला देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याची घाई झाली आहे. या दिशेने पीसीबीने प्रयत्न चालविले असून, वेस्ट इंडीज संघाला आमंत्रण देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.विंडीजचे सुरक्षा पथक या महिन्याखेरीस आणि पुढील महिन्याच्या सुरुवातीला पाकमध्ये येणार आहे. पथक लाहोरचा दौरा करेल. पाकिस्तानसाठी आयसीसीचे विशेष कार्यप्रमुख असलेले जाईल्स क्लार्क हेदेखील सुरक्षा पथकासोबत २७ जानेवारीला लाहोरमध्ये दाखल होणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ज्येष्ठ अधिकारी नजम सेठी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आम्ही वेस्ट इंडीज संघाला दोन किंवा तीन टी-२० सामने खेळण्याचे आमंत्रण दिले आहे. मार्च-एप्रिल महिन्यांत विंडीज- पाकिस्तान यांच्यात तीन टी-२० सामने खेळविले जातील. त्यानंतर कॅरेबियन देशात पूर्णकालीन कसोटी मालिका खेळविली जाईल. पाकने फ्लोरिडात काही टी-२० सामने खेळावेत, अशी विंडीजची इच्छा आहे. आम्ही त्यांना पाकमधील सुरक्षेची व्यापक माहिती आणि योजना पाठविली आहे. क्लार्क यांचा दौरादेखील महत्त्वपूर्ण असेल. पाकमधील सुरक्षेचा प्रश्न निकाली निघाल्याबाबतच्या त्यांच्या अहवालावर उभय देशांत होणाऱ्या मालिकेचे भविष्य अवलंबून असेल.’ (वृत्तसंस्था)
विंडीजचे पथक पाक दौरा करणार
By admin | Published: January 07, 2017 4:34 AM