ऑनलाइन लोकमत
क्राईस्टचर्च, दि. २१ - वर्ल्डकपमध्ये आयर्लंडकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या वेस्ट इंडिजने शनिवारी दमदार पुनरागमन करत पाकिस्तानला धूळ चारली. वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा १५० धावांनी पराभव केला असून १३ चेंडूत ४२ धावा ठोकणा-या आणि पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवणा-या वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू अँड्रे रसेलला सामनावीराचा किताब पटकावला.
वर्ल्डकपमध्ये शनिवारी पाकिस्तान व वेस्ट इंडिज हे संघ आमने सामने होते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस गेल आणि ड्वॅन स्मिथ या सलामीवीरांना पाकच्या गोलंदाजांनी अवघ्या २८ धावांमध्येच माघारी पाठवले. यानंतर डॅरेन ब्राव्हो आणि मार्लोन सॅम्यूअल्स या जोडीने ७५ धावांची भागीदारी करत विंडीजला शंभरी गाठून दिली. दिनेश रामदीन ५१ धावांवर बाद झाला त्यावेळी विंडीजची अवस्था ३९. ५ षटकांत ४ बाद १९४ अशी होती. यानंतर लेंडल सिमन्स (५०धावा), डॅरेन सॅमी (३० धावा) आणि अँड्र रसेलच्या तडाखेबाज नाबाद ४२ धावांच्या खेळीने विंडीजने ५० षटकांत ६ गडी गमावत ३१० धावा केल्या. पाकिस्तानने या सामन्यातही ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. पाकिस्तानने आज तब्बल ४ झेल सोडले. यातील दोन झेल शाहिद आफ्रिदीने सोडले.
विंडीचे ३११ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरणा-या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिल्या तीन षटकांत अवघ्या एका धावेच्या मोबदल्यात पाकने चार गडी गमावले. संघाच्या १ धावा झाल्या असतानाच ४ गडी गमावत पाकिस्तानने विक्रमच रचला. यापूर्वी कॅनडाने झिम्बाब्वेविरोधात ४ धावांच्या मोबदल्यात ४ धावा गमावल्या होत्या. नासीर जमशेद, युनूस खान, हॅरिस सोहेल हे तिघे भोपळा न फोडताच तंबूत परतले. तर अहमद शेहजाद १ धावांवर बाद झाला. पाकिस्तानच्या २४ धावा झाल्या असताना कर्णधार मिसबाह उल हकही बाद झाला व पाकची अवस्था ५ बाद २५ अशी झाली.
उमर अकमल (५९ धावा) आणि सोहेब मकसूद (५० धावा) या जोडीने महत्त्वपूर्ण भागीदारी करत पाकिस्तानला लाजीरवाण्या पराभवापासून रोखले. ही जोडी बाद झाल्यावर शाहिद आफ्रिदीने २८ धावांची खेळी करत पाकला १५०चा टप्पा गाठून दिला. अखेरीस १६० धावांवर पाकचा डाव संपुष्टात आला. वेस्ट इंडिजने पाकवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. विंडीजतर्फे जेरॉम टेलर व अँड्रे रसेलने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर सुलेमान बेनने दोन विकेट घेतल्या. जेसन हॉल्डर व डॅरेन सॅमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.