नवी दिल्ली : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ २०१४ साली क्रिकेट मालिका मध्येच सोडून गेल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर केलेल्या ४ कोटी २० लाख डॉलरच्या दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी ही माहिती दिली. या मालिकेतील राहिलेले सामने आता २०१७ साली खेळले जाणार आहेत. त्यासाठी वेस्ट इंडिज संघ पुन्हा भारताचा दौरा करेल. वेस्ट इंडिज बोर्डाशी वाद झाल्याने खेळाडूंनी हा दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर बीसीसीआयने वेस्ट इंडिज बोर्डावर दंडात्मक कारवाई केली होती. याविषयी माहिती देताना मनोहर म्हणाले, ‘‘वेस्ट इंडिज बोर्डाशी झालेल्या चर्चेत बीसीसीआयने केवळ दोन्ही संघांत पुन्हा सामने व्हावेत यावरच चर्चा केली. त्या वेळी अपूर्ण राहिलेल्या सामन्यांच्या मालिकेची कार्यक्रमपत्रिका मे महिन्याच्या अखेरपर्यंत ठरेल.’’ वेस्ट इंडिज बोर्डाचे अध्यक्ष डेव्हिड कॅमेरून म्हणाले, ‘‘भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत होण्यास मदत झाली आहे.’’ आॅक्टोबर २०१४ साली ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली विंडीज भारत दौऱ्यावर आला होता. त्या वेळी पाच एकदिवसीय, एक टी-२० व तीन कसोटी खेळले जाणार होते. मात्र, मानधनावरून क्रिकेट मंडळाशी मतभेद झाल्याने चार एकदिवसीय सामन्यांनंतर खेळाडू मायदेशी परतले होते. या मालिकेतील अखेरचा सामना धरमशाला येथे खेळण्यात आला होता. (वृत्तसंस्था) >‘‘वेस्ट इंडिज संघ २०१४ साली भारत दौरा अर्धवट सोडून गेल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या बोर्डाला ४ कोटी २० लाख डॉलरचा दंड ठोकला होता. मात्र ही दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही क्रिकेट मंडळातील कडवेपणा संपुष्टात आला आहे. भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून, तेथे ४ कसोटी सामने खेळेल. तर २०१४ साली अपूर्ण राहिलेल्या दौऱ्यातील सामने पूर्ण करण्यासाठी वेस्ट इंडिजदेखील भारत दौरा करणार आहे. - शशांक मनोहर, अध्यक्ष, बीसीसीआय
वेस्ट इंडिजच्या चुकीला माफी...
By admin | Published: April 23, 2016 4:11 AM