मुंबई : कर्णधार अनिकेत पोटे, निखील वाघे, सागर घाग, संकेत कदम, ऋषिकेश मुर्चावडे यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पहिल्या डावात २ गुणांनी पिछाडीवर राहूनही मुंबई विद्यापीठाने बीएएम युनिव्हर्सिटी-औरंगाबाद संघाचे आव्हान 18-17 असे 40 सेकंद राखून संपुष्टात आणले. तृतीय क्रमांकाची लढत कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीने जिंकताना एस.पी.पुणे विद्यापीठाचा 17-16 असा 4.10 मिनिटे राखून पराभव केला.
वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावर मुंबई विद्यापीठ विरुद्ध बीएएम युनिव्हर्सिटी-औरंगाबाद यामधील अंतिम सामना अटीतटीमध्ये रंगला. अष्टपैलू हर्षद हातणकर (०.५० व १ मि., ४ गडी), पियुष घोलम (१.३० व ०.३० मि., ३ गडी), दुर्वेश साळुंखे (१.२० मि., ३ गडी), अक्षय भांगरे (०.४० व १.१० मि., २ गडी) यांच्या सुंदर खेळामुळे बीएएम युनिव्हर्सिटी-औरंगाबाद संघाने प्रारंभ दणक्यात करीत मुंबई विद्यापीठाविरुद्ध मध्यंतराला ११-९ अशी आघाडी घेतली. परंतु उत्तरार्धात विजयाचे पारडे मुंबई विद्यापीठाच्या बाजूने झुकाविताना कप्तान अनिकेत पोटे ( ०.१० व १ मि. व ३ गडी), निखील वाघे (०.२० व १ मि. व ४ गडी), सागर घाग (१.३० व १.५० मि.,३ गडी), संकेत कदम (२.०० व १.३० मि., १ गडी), ऋषिकेश मुर्चावडे (०.३० व १.१० मि.,२ गडी), शुभम उत्तेकर (३ गडी) आदी खोखोपटूनी दमदार खेळ केला आणि मुंबई विद्यापीठाच्या विजेतेपदावर १८-१७ असा शिक्कामोर्तब केला.
निलेश जाधव (२.२० व १.३० मि.), अभिनंदन पाटील (०.२० व १.१० मि., ४ गडी), अरुण घोन्की (१.०० व २.२० मि., २ गडी) यांच्या अप्रतिम खेळामुळे शिवाजी युनिव्हर्सिटीने एस.पी.पुणे विद्यापीठावर १७-१६ असा ४.१० मिनिटे राखून विजय मिळविला आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार शिवाजी युनिव्हर्सिटीने जिंकला. पुणे विद्यापीठातर्फे सागर लेंगरे, वैभव पाटील यांनी छान खेळ केला.