मुंबई : सलामीवीर मयांक अगरवालच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण विभागाने सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत पहिला विजय मिळवताना बलाढ्य पश्चिम विभागाचा ५ विकेटने पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर, पश्चिम विभागाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १४० धावा अशी मजल मारली. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभवास सामोरे गेलेल्या दक्षिण विभागाने या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना अगरवालच्या जोरावर बाजी मारली. अगरवालने ४६ चेंडंूत ९ चौकार व २ षटकारांसह ७० धावांची वेगवान खेळी केली. तसेच, अन्य सलामीवीर विष्णू विनोदने २० चेंडंूत ३६ धावांचा तडाखा दिला. या जोरावर दक्षिणेने १७.४ षटकांतच विजय मिळवताना ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १४१ धावा केल्या. तत्पूर्वी पश्चिम विभागाचा एकही फलंदाज फारवेळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. दीपक हुडाने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केल्याने पश्चिम संघाला समाधानकारक मजल मारता आली. त्याशिवाय इरफान पठाण (२६), आदित्य तरे (२६) आणि शेल्डॉन जॅक्सन (२३) यांनी छोटेखानी खेळी केल्या. चमा मिलिंद (३ बळी), विजय शंकर (२), एम. आश्विन (२) आणि राहिल शाह (२) यांनी पश्चिमेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. दक्षिण विभागाने तीन सामन्यांतून पहिला विजय मिळवला असून, पश्चिमेला दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. आता दोन्ही संघांचे तीन सामन्यांनंतर प्रत्येकी ४ गुण झाले आहेत. परंतु, दमदार धावगतीच्या जोरावर पश्चिम विभागाने सरशी साधली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
दक्षिणकडून पश्चिम विभागाचा पराभव
By admin | Published: February 17, 2017 12:26 AM