पणजी : गोव्यात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर राज्य बॅडमिंटन स्पर्धेत माजी विजेत्या महाराष्ट्र संघाने अंतिम फेरीत धडक दिली. आता ज्युनियर मिश्र सांघिक गटात महाराष्ट्राचा अंतिम सामना बलाढ्य गुजरातविरुद्ध होईल. ही स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने गोव्याचा पराभव केला. तर गुजरातने मध्यप्रदेशचा पराभव केला. वरिष्ठ मिश्र दुहेरी गटात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि चंदिगड या संघांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. गोव्याचे आव्हान संपुष्टातस्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंनी संघर्ष केला, मात्र त्यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. गोव्याला छत्तीसगड आणि महाराष्ट्र संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. वरिष्ठ सांघिक गटात गोवा संघावर छतीसगडने तर महाराष्ट्र संघाने पराभव केला. दोन्ही सामने गोव्याने ३-० अशा फरकाने गमावले. दरम्यान, या स्पर्धेचे उद्घाटन सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी विरोधी पक्षनेत दिगंबर कामत, बॅडमिटन असोसिएशन आॅफ इंडियाचे निरीक्षक मयूर पारेख, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. निकाल असे : मिश्र दुहेरी ज्युनियर्स (उपांत्य फेरी-१) -महाराष्ट्र वि. वि. गोवा (३-०), रोहन थूल वि. वि. सुशील नायक २१-१४, १३-२१, २१-१७. तारा साहा वि. वि. लिडिया बारेट्टो २१-१३, १७-२१, २१-५. हर्षल जाधव-यश साह वि. वि. अर्जुन फळारी-सौम्या जोशी २१-१८, १९-२१, २१-८. उपांत्य फेरी-२- गुजरात वि. वि. मध्य प्रदेश (३-०). अनिरुद्ध कुशवाह वि. वि. भुवन कोतीकाला १९-२१, २१-६, २१-१३. श्रेया लेले वि. वि. ऐश्वर्या मेहता २१-११, २१-१२. अनिरुद्ध-भाविन वि. वि. जयंत सिसोदिया-यश रायकवार २१-१८, २१-१४.
पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धा : महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 11:09 PM