पणजी : संतोष चषक पात्रता पश्चिम विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी गोवा राज्य सज्ज झाले आहे. ही स्पर्धा म्हापसा-धुळेर मैदानावर २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान खेळविण्यात येईल. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, दीव अॅण्ड दमण, लक्षद्विप, सेनादल, राजस्थान, दादर आणि नगर हवेली, मध्य प्रदेश आणि गोवा अशा ९ संघांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी संघ गोव्यात दाखल झाले आहेत. स्पर्धेत गोवा संघ ‘ब’ गटात आहे. या गटात राजस्थान, मध्य प्रदेश आणि दादर आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. ‘अ’ गटात महाराष्ट्र, गुजराज, दमण अॅण्ड दिव, लक्षद्विप आणि सेनादलाचा समावेश आहे. पहिला सामना गुजराज आणि सेनादल यांच्यात रविवारी (दि.२२)तर दुसरा सामना दमण व दिव आणि महाराष्ट्र यांच्यात होईल. गोव्याचा सामना राजस्थानविरुद्ध २३ रोजी, २५ रोजी मध्य प्रदेशविरुद्ध आणि दादर आणि नगर हवेलीविरुद्ध २७ रोजी सामना होईल. दरम्यान, गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव हे स्पर्धेचे उद्घाटन करतील. यासंदर्भात, गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव म्हणाले की, स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत. राज्य संघटनेचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत. ही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास मला आहे. ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून मी सर्व राज्य संघाकडून सहकार्याची अपेक्षा करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. गोव्याच्या संघाबाबत आलेमाव म्हणाले की, लाविनो परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचा संघ मैदानात उतरणार आहे. हा संघ मजबूत असेल असा विश्वास आहे. चॅम्पियन बनण्यासाठी संघातील खेळाडू सर्वाेतोपरी प्रयत्न करतील. स्पर्धेसाठी कार्यकारी समिती : अध्यक्ष-चर्चिल आलेमाव, उपाध्यक्ष लाविनो रिबेलो, अॅन्थोनी पांगो.कार्यकारी सचिव-ग्रेग डिसोझा, सहाय्यक सचिव- जॉन फर्नांडिस (निवास), डॉम्निक परेरा (जनसंपर्क), मौरासिओ आल्मेदा (पंच), बबली मांद्रेकर (मैदान आणि लॉजिटिक्स), डॉ. फेन्टन डिसोझा (वैद्यकीय) आणि अॅन्थोनी लोबो (स्टेडियम व्यवस्थापक).
पश्चिम विभागीय फुटबॉल स्पर्धा : संतोष चषकासाठी गोवा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 9:20 PM