पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील विनेश फोगाटच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरण निकाली काढण्यात विलंब होताना दिसत आहे. आता या बहुप्रतिक्षित निकाला संदर्भात भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते पदक देशाचे आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा निकाल हा भारताच्या बाजूनं लागावा, असे भारतीय कुस्ती महासंघाला वाटते, असे अध्यक्षांनी म्हटले आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले की, भारताला कुस्तीमध्ये आणखी ६ पदके जिंकता आली असती, परंतु गेल्या १५-१६ महिन्यांतील या खेळातील अस्वस्थतेमुळं आपणं अनेक पदके गमावली आहेत. आता आम्हाला आशा आहे की. क्रीडा लवादाचा निकाल आमच्या बाजूनं लागेल. निकाल भारताच्या बाजूनं लागावा हीच भारतीय कुस्ती महासंघाची इच्छा आहे. कारण ते देशाचे पदक आहे, कुणाचे वैयक्तिक पदक नाही.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटातून मैदानात उतरली होती. तिने दिमाखदार कामगिरीसह अंतिम फेरी गाठत इतिहासही रचला. ऑलिम्पिक स्पर्धेतील कुस्तीची फायनल गाठणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. मात्र अंतिम लढतीआधी १०० ग्रॅम अतिरिक्त वजन असल्यामुळे तिच्यावर गोल्ड मेडलसाठीची मॅच मुकावी लागली. एवढेच नाही, तर हातात आलेले पदक मिळवण्यासाठी आता कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून राहण्याची वेळही आली आहे.
अतिरिक्त वजन वाढल्यामुळे अपात्रतेची कारवाई केल्यानंतर विनेश फोगाट हिने क्रीडा लवादाच्या न्यायालयात (CAS) धाव घेतली आहे. संबंधित याचिकेतून कुस्तीपटूनं संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी मागणी केली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) नं शेअर केलेल्या माहितीनुसार, मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी यासंदर्भातील निकाल अपेक्षित होता. पण ही तारीख आता पुढे ढकलली आहे. १६ ऑगस्ट ही आता या प्रकरणाच्या निकालाची नवी तारीख असल्याचे बोलले जात आहे. निकाल लांबणीवर पडत असल्यामुळे या प्रकरणात सकारात्म गोष्ट घडेल, अशी चर्चाही आता रंगताना दिसते.