पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक मुसंडी मारूनही पदकाशिवाय मायदेशी परतण्याची वेळ विनेश फोगाटवर आली आहे. शेवटच्या क्षणी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यामुळे कुस्तीच्या आखाड्यात मिळालेले पदक गमावलं. तरी तिची कामगिरी अविस्मरणीय ठरली, यात कुणाच्याही मनात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची ऑलिम्पिकमधील कामगिरी उल्लेखनिय असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना संबोधित करत असताना विनेश फोगाटचा खास उल्लेख केला. मोदी म्हणाले आहेत की, "विनेशनं अंतिम फेरीपर्यंत पोहचत एक इतिहास रचला. फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात फायनल गाठणारी विनेश फोगाट ही पहिली भारतीय महिला आहे. तिची ही कामगिरी देखील अभिमानास्पद आहे."
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी टोकियोच्या तुलनेत घसरली. जगातील मानाच्या स्पर्धेत भारत पदकांचा दुहेरी आकडा गाठेल, अशी अपेक्षा होती. पण वेगवेगळ्या खेळात मोक्याच्या क्षणी भारताच्या पदरी अपयश आले. त्यात विनेश फोगाटच्या रुपात मोठा धक्का बसला. १०० ग्रॅम वजन अतिरिक्त असल्यामुळे विनेशसह भारताच्या हाती आलेले पदक हुकलं. अंतिम लढती आधी ती अपात्र ठरली. या प्रकरणात विनेशनं क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. संयुक्त रौप्य पदकासाठी तिने जी याचिका दाखल केली होती ती फेटाळण्यात आली.
भारताकडून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेनंतर बहुतांश खेळाडू मायदेशी परतले आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी वेगवेगळ्या खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली. नीरज चोप्रासह विनेश फोगाटचा यात समावेश नव्हता. कारण नीरज चोप्रा पॅरिसहून थेट जर्मनीला गेला आहे. विनेश फोगाट ही १७ ऑगस्टला मायदेशी परतणार असल्याचे समजते. नीरज आणि विनेश फोगाटशिवाय पीव्ही सिंधूही पंतप्रधानांच्या निवासस्थानी जमलेल्या ऑलिम्पिक खेळाडूंसोबत दिसली नाही. सिंधूला पॅरिसमध्ये हॅटट्रिकची संधी होती. पण तिला अपयशाचा सामना करावा लागला होता.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने १ रौप्य आणि ६ कांस्य पदकं जिंकली. नेमबाजीत सर्वाधिक पदकं मिळाली. यात मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्निल कुसाळे यांच्या यशस्वी कामगिरीचा समावेश आहे. अमन सेहरावत याने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला यावेळी रौप्यवरच समाधान मानावे लागले. याशिवाय हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले.