ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - क्रिकेटपटू विराट कोहलीने करीयरमध्ये आज जी उंची गाठली आहे त्यामध्ये त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचा महत्वाचा वाटा आहे. आज जागतिक क्रिकेटमध्ये विराट नावलौकीक मिळवत असला तरी, त्याच्यामधल्या गुणवान फलंदाजाला हेरुन पैलू पाडण्याचे महत्वाचे काम राजकुमार शर्मा यांनी केले.
विराटने सुद्धा नाव कमावल्यावर आपल्या प्रशिक्षकांप्रती जाणीव ठेवली. ज्यांनी त्याला घडवले त्यांना तो विसरला नाही. क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली यांनी लिहीलेल्या पुस्तकात विराट आणि राजकुमार शर्मा यांच्यामधील गुरु-शिष्याच्या नात्याचा उल्लेख करताना त्यांनी एका घटनेचे वर्णन केले आहे.
एका सकाळी माझ्या दरवाजावरची बेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर विराटचा मोठा भाऊ विकास उभा होता. इतक्या सकाळी दरवाजात विकासला बघून मला चिंता वाटली. विकास घरात आला. त्याने त्याच्या मोबाईलवरुन फोन लावला आणि माझ्या हातात मोबाईल दिला. समोरुन विराटचा आवाज आला. त्याने मला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तितक्यात विकासने माझ्या हाताता चाव्यांचा एक गुच्छ ठेवला. विकासने मला घराबाहेर येण्याची विनंती केली. मी त्याच्याबरोबर बाहेर आलो तर समोर नवी कोरी स्कोडा उभी होती. शिक्षक दिनी विराटने दिलेली ती सुंदर भेट होती असे राजकुमार यांनी सांगितल्याचे विजय यांनी पुस्तकात लिहीले आहे.