ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आता अचूक भविष्य सांगू लागला आहे. सचिनने वर्ल्डकप सुरु होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व भारत हे चार संघ सहभागी होतील अशी भविष्यवाणी वर्तवली होती व ही भविष्यवाणी आता अचूक ठरली आहे.
वर्ल्डकपमध्ये शनिवारी न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आता सेमीफायलमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत व दक्षिण आफ्रिका हे चार संघ दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर सचिन तेंडूलकरचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. प्लेईंग इट माय वे या आत्मचरित्राचे इंग्लंडमध्ये प्रकाशन करताना सचिन तेंडुलकरने वर्ल्डकपविषयी भविष्यवार्णी केली होती. वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये दाखल होणारे संघ कोणते असा सवाल सचिनला विचारण्यात आला होता. यात सचिनने या चार संघाचीच नावे घेतली होती. भारत वर्ल्डकपमध्ये चमत्कार करु शकतो असा त्याने सांगितले होते. तसेच इंग्लंडचा फॉर्म पाहता ते वर्ल्डकपमध्ये फारशी चमकदार कामगिरी करणार नाही असेही त्याने नमूद केले होते. सचिननी ही भविष्यवाणी तंतोतंत खऱी ठरल्याने सचिन आता अचूक भविष्यवाणी सांगणा-यांचाही गुरु ठरला आहे.