ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - सध्या सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये क्रिकेटपटूंसोबत त्यांची पत्नी किंवा प्रेयसीला राहू द्यायला परवानगी हवी की नको यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे. वर्ल्डकपमध्ये पत्नीसोबत राहावी यासाठी क्रिकेटपटूही काय करतील याचा नेम नाही. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज साकलेन मुश्ताक याने १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये पत्नीला चक्क कपाटात लपवले होते. खुद्द साकलेन मुश्ताकनेच या गंमतीशीर आठवणी क्रिकेटप्रेमींसोबत शेअर केल्या आहेत.
एका वेबसाईटसाठी लिहीलेल्या लेखात पाकचा माजी क्रिकेटपटू साकलेन मुश्ताकने १९९९ च्या वर्ल्डकपच्या आठवणींना उजाळा दिला. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आम्हाला पत्नीला सोबत नेण्याची परवानगी दिली होती. दौरा चांगला जात होता आणि वेळ मिळाल्यावर आम्ही सहकुटुंब भटकंतीही करायचो. मात्र सेमीफायनलपूर्वी बोर्डाने आम्हाला पत्नींना सोबत ठेवता येणार नाही असा आदेश काढला. बोर्डाच्या या निर्णयानंतर मी रुमवर आलो. पत्नी सानाला सांगितले तू परत जाणार नाही, या दौ-यात मला तुझी साथ हवी आहे असे तिला सांगितल्याचे साकलेन सांगतो.
आम्ही ज्या हॉटेलवर जायचो तिथे माझ्यापूर्वी माझी पत्नी चेक इन करायची. मी आल्यावर ती माझ्या रुममध्ये येऊन राहायची. संघ मॅनेजर किंवा अन्य खेळाडू आले की तिला कपाटात लपवून द्यायचो असे साकलेनने स्पष्ट केले. अझहर महमूद आणि मोहम्मद युसूफला या प्रकाराची माहिती होते असे त्याने म्हटले आहे. हा किस्सा सांगताना साकलेन म्हणतो, एकदा अझहर महमूद आणि मोहम्मद युसूफ माझ्या खोलीत आले व जोरजोरात माझ्यावर हसू लागले. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघू लागलो. शेवटी माझी पत्नी माझ्यासोबतच राहते हे माहित असल्याचे त्यांनी सांगितले व आता आम्ही आल्यावर तिला कपाटात लपवू नकोस असे सांगून दोघेही माघारी परतले.