नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांवर वाद निर्माण होणे नवीन नाही. यंदाही नव्या वादाला तोंड फुटले. क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी ‘खेलरत्न’ पुरस्काराची मानकरी ठरलेल्या महिला मल्ल साक्षी मलिक आणि भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समितीने सुचविलेल्या २९ पैकी २७ खेळाडूंनाच हा पुरस्कार मिळणार आहे. या निर्णयामुळे हताश झालेल्या साक्षी मलिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली शिवाय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना प्रश्न विचारला आहे.
साक्षीला २०१७ ला देशातील चौथा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कारणास्तव यंदा तिला अर्जुन पुरस्कार नाकारण्यात आला. मागच्या आठवड्यात न्या.(सेवानिवृत्त) मुकुंदकम शर्मा यांच्या नेतत्वाखालील निवड समितीने २९ जणांच्या नावांची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. साक्षी आणि मीराबाई या दोघींना अर्जुन पुरस्कार देण्याचा निर्णय रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आला होता. समितीने यादीत दोघींच्या नावाचा समावेश केला, तेव्हापासूनच टीका होऊ लागली होती. कोरोनामुळे २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात होणार नाही. विजेत्यांना व्हर्च्युअल पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या साक्षीने, ‘माझ्या नावामागे अर्जुन पुरस्कार विजेती अशी बिरुदावली लागावी हे माझे स्वप्न आहे. अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी असे कुठले पदक जिंकावे,’ हे आपणच सुचवा, असा प्रश्न क्रीडामंत्र्यांना विचारला आहे. तिने पुढे लिहिले, ‘मा. मोदीजी आणि मा. क्रीडामंत्रीजी, मला खेलरत्नने सन्मानित करण्यात आले याचा अभिमान वाटतो. सर्व पुरस्कार आपल्या नावावर असावेत असे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. खेळाडूू यासाठी प्राणाची बाजी लावतो. मला अर्जुन पुरस्कार मिळावा, हे स्वप्न आहे. कुस्ती कारकीर्दीत कधीही अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्याचे स्वप्न माझ्या वाट्याला येणार नाही काय?’