ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई इंडियन्स आणि पुणे रायजिंग सुपरजायंट्स दरम्यान झालेला चित्तथराराक अंतिम सामना तुम्ही पाहिला असेल तर या आजीबाईंना तुम्ही नक्की पाहिलं असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला असला तरी शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकेल याची कल्पना नव्हती. दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ ठरत असताना दोन्ही संघाचे समर्थक मात्र कमालीचे चिंतेत होते. यादरम्यान मैदानात एक आजीबाई हात जोडून देवाला साकडं घालत असल्याचं दिसत होतं. या आजीबाई नेमक्या कोणत्या संघाला पाठिंबा देत होत्या माहित नाही, पण त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला आणि या आजीबाईंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. आजाबाईंचा फोटो प्रचंड व्हायरल होऊ लागला. यांच्या प्रार्थनेमुळेच मुंबई जिंकली अशा पोस्ट फिरु लागल्या. पण या आजीबाई कोण आहेत याची कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे साहजिकच अनेकांनी त्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला.
अखेर मुंबई इंडियन्सनेच ट्विट करत त्यांची ओळख सांगितली. या आजीबाई दुस-या तिस-या कोणी नसून मुंबई इंडियन्सचे मालक निता अंबानी यांच्या आई पूर्णिमाबेन दलाल आहेत. त्या मुंबई इंडियन्सच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत.
Certified Mumbai Indians fan and Mrs. Nita Ambani’s mother, Purnimaben Dalal did all she could to bring the IPL trophy home. #ThankYouNanipic.twitter.com/SIlxdMDOaL— Mumbai Indians (@mipaltan) May 22, 2017
पुणे संघाला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. यावेळी स्टेडिअममध्ये दोन्ही संघाचे चाहते हात जोडून, डोळे मिटून आपला संघ विजयी व्हावा यासाठी प्रार्थना करत होते. त्यावेळी कॅमेरामनने पूर्णिमाबेन दलाल यांना टिपले. त्यादेखील मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी प्रार्थना करत होत्या. पहिल्याच चेंडूवर मनोज तिवारीने चौकार मारत सामना पाच चेंडूत सात धावांवर आणला. यापुढची मॅच पाहणं कठीण असल्याने पूर्णिमाबेन दलाल यांनी डोळेच मिटून घेतले आणि देवाचा धावा करण्यास सुरुवात केली.
जॉन्सनने पुढच्या दोन चेंडूत दोन विकेट्स घेतल्या आणि मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. शेवटच्या चेंडूत चार धावांची गरज होती. अखेर मुंबईने फक्त एका धावेने पुण्याचा पराभव करत तिस-यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले.