ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - भारत दौऱ्यात सपाटून मार खाणाऱ्या इंग्लिश क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटमध्ये नवा कर्णधार मिळाला आहे. धडाकेबाज युवा फलंदाज आणि उपकर्णधार जो रूट याची इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बेन स्टोक्सकडे संघाचे उपकर्णधारपद सोपवले आहे. भारत दौऱ्यातील सुमार कामगिरीनंतर कूकने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद रिक्त झाले होते.
" इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदी झालेली निवड हा मी माझा सन्मान समजतो. आता नवी जबाबदीरी स्वीकारण्यासाठी मी उत्सूक आहे, "असे रूटने कर्णधारपदी निवड झाल्यानंतर सांगितले. या वर्षी जुलै महिन्यात घरच्या मैदानावर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून रूटच्या नेतृत्वाची सुरुवात होईल. त्यानंतर इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. तसेच वर्षअखेरीस प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
2012 साली भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 52.80च्या सरासरीने 4 हजार 594 धावा फटकावल्या आहेत. तसेच 2015 पासून तो संघाच्या उपकर्णधारपदी आहे.