भारताची लेक विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण अखेरच्या लढतीआधी ती अपात्र ठरली. महिलांच्या फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात 50 किलो वजनी गटात ती भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसली. अंतिम लढतीच्या दिवशी सकाळी 100 ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे विनेश फोगाटचे फायनलचे दरवाजे बंद झाले. ती अपात्र असल्याची घोषणा करण्यात आली. हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादापर्यंत पोहचले आहे. विनेशला रौप्य पदक मिळवून देण्यासाठी आता प्रसिद्ध वकील हरिश साळवे या प्रकरणात सक्रीय झाले आहेत.
सुवर्ण संधी हुकली; रौप्य पदकासाठी आखाड्याबाहेर सुरुये लढाई!
सुवर्ण संधी हुकल्यानंतर किमान रौप्य पदक मिळावे, अशी मागणी विनेश फोगाटनें केली आहे. यासाठी तिने आंतरराष्ट्रीय लवादाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात प्रसिद्ध वकील हरिश साळवे तिची बाजू मांडणार आहेत. जाणून घेऊयात कोण आहेत हरिश साळवे? आणि त्यांचे गाजलेले काही खटले
पाकला दणका देणारे वकील मांडणार विनेश फोगाटची बाजू
विनेश फोगाट हिला न्याय देण्यासाठी पुढे आलेले ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी कुलभूषण प्रकरणात पाकिस्तानला हिसका दाखवला होता. आता आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर ते भारतीय ऑलिम्पिक समतीकडून विनेश फोगाटसाठी लढताना दिसतील.
मराठमोळ्या चेहऱ्याची प्रसिद्ध आणि महागड्या वकिलांमध्ये लागते वर्णी
विनेश फोगाट प्रकरणात एन्ट्री मारल्यानंतर हरिश साळवे हे नाव आता चर्चेत आहे. ते एक प्रतिष्ठित आणि महागड्या वकिलांपैकी एक आहेत. वयाच्या 68 व्या वर्षी देखील ते कमालीचे सक्रीय असल्याचे दिसून येते. मोठी मोठी प्रकरणे सहज आणि यशस्वीरित्या हताळण्याचा त्यांचा हातखंडा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. 22 जून 1955 रोजी महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबियात हरिश साळवे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केपी साळवे हे सीए तर आई अंब्रीती सास्वे या डॉक्टर होत्या. हरिश साळवे यांचे आजोबा प्रसिद्ध क्रिमिनल वकील होते. त्यांचा वारसा हरिश साळवे यांनी पुढे नेला.
हरिश साळवे यांचे शिक्षण
हरिश साळवे यांनी नागपूर येथील सेंट फ्रान्सिस डी' सेल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी ICAI चार्टेड अकाउंटची पदवी घेतली. नागपूर विद्यापीठातून LLB चं शिक्षण पूर्ण केल्यावर वकिली करण्याआधी त्यांनी सीएच्या रुपातही काम केले आहे.
हरिश साळवे यांनी गाजवलेले खटले
- 1975 मध्ये अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी संबंधित ब्लॅकमनी प्रकरणातील खटल्यानं त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
- व्होडाफोन संबंधित 14,200 कोटींच्या कथित कर चुकवेगिरी प्रकरणातील गाजलेला खटलाही त्यांनी जिंकला होता.
- 2015 मध्ये हिट अँण्ड रन प्रकरणात त्यांनी सलमान खानची बाजू मांडली होती.
- 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात ते कुलभूषण जाधव यांच्या बाजूनं खटला लढले होते. पाकिस्तान विरोधातील या प्रकरणात त्यांनी फक्त 1 रुपये इतकीच फी आकारली होती.