नवी दिल्ली : कोरिया येथे येत्या बुधवारपासून रंगणाऱ्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (आयएसएसएफ) विश्वचषक नेमबाजीत अचूक निशाणा साधणाऱ्या नेमबाजांना रियो आॅलिम्पिकचे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नेमबाज जितू राय, अभिनव बिंद्रा, गगन नारंग, अयोनिका पॉल, हिना सिद्धू यांच्यावर देशाचे लक्ष लागून राहिले आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये स्पेन येथील ग्रेनडा येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर ही पहिली आॅलिम्पिक कोटा स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतून १४ पुरुष व दहा महिला खेळाडूंना आॅलिम्पिकचे तिकीट निश्चित होणार आहे. गेल्या वर्षी सात आंतरराष्ट्रीय पदकांचा वेध घेत नेमबाज राय याने आॅलिम्पिकची जागा निश्चित केली आहे. राय ५० मीटर फ्री पिस्टल प्रकारात दुसऱ्या स्थानावर होते. तर बिंद्रा इंचियोन आशियाई स्पर्धेनंतर पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे. बीजिंग आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बिंद्राने जर्मनीतील हनोवर येथील स्पर्धेस भाग घेतला होता. लंडन आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता नारंगवर देखील सर्वांच्या नजरा असतील. नारंग ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सातव्या क्रमांकावर असलेली अयोनिका पॉलकडूनही खूप अपेक्षा आहेत. यापूर्वी अव्वल क्रमांकावर असलेली हिना सिद्धू हिने देखील पुनरागमन केले असून, तिलाही आॅलिम्पिक कोटा मिळण्याची आशा आहे. (वृत्तसंस्था)
रिओ आॅलिम्पिकचा निशाणा कोण साधेल ?
By admin | Published: April 06, 2015 3:09 AM