लंडन : मागच्या सात ग्रॅन्डस्लॅममध्ये दुसऱ्या जेतेपदासाठी सज्ज असलेल्या अॅश्ले बार्टीला शनिवारी विम्बल्डनटेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या निर्णायक लढतीत कॅरोलिना पिलिसकोवा हिचे अवघड आव्हान पेलावे लागणार आहे. पिलिसकोवा दुसऱ्यांदा ग्रॅन्डस्लॅमच्या अंतिम फेरीत दाखल झाली असली तरी तिला पहिल्यावहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे.ऑस्ट्रेलियाच्या २५ वर्षांच्या अव्वल मानांकित अॅश्ले बार्टी हिने उपांत्य लढतीत २०१ ८ च्या विजेत्या अँजेलिक कर्बर हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. झेकोस्लोव्हाकियाची आठवी मानांकित कॅरोलिना पिलिसकोवाने दुसरी मानांकित आर्यना सबालेंका हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
‘ आज मी सर्वोत्तम खेळ केला . फ्रेंच ओपन नंतर इथल्या सामन्यात फार कमी कालावधी असल्याने सराव, शारीरिक क्षमता आणि नियोजन याला कमी वेळ मिळतो . अंतिम सामन्यासाठी उत्सुक असून बालपणापासून जोपासलेले स्वप्न पूर्ण होईल, यात शंका नाही .’- ॲश्ले बार्टी
‘या वाटचालीवर विश्वासच बसत नाही. अंतिम फेरीत जाण्याचा विचार देखील केला नव्हता. पहिला सेट गमावूनही मी पुढे परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. अर्थातच ॲश्लेला हरविणे सोपे नाही. पण मी पूर्वी तिला हरविले आहे.त्यामुळे अटीतटीची लढत अपेक्षित आहे.’- कॅरोलिना पिलिसकोवा
पिलिसकोवा ही २०१६ च्या अमेरिकन ओपनमध्ये अव्वल मानांकन लाभलेल्या दोन खेळाडूंना पराभूत करण्याच्या जवळपास पोहोचली होती.
तिने उपांत्य सामन्यात सेरेना विलियम्सचा तर पराभव केला मात्र अंतिम लढतीत नंबर दोन ॲंजेलिस कर्बरकडून ती पराभूत झाली. बार्टी आणि पिलिसकोवा यांच्यात आतापर्यंत ७ सामने झाले. त्यात बार्टीने ५-२ अशी बाजी मारली.
४१ वर्षानंतर इतिहास घडणार? उदय बिनिवाले -लंडन: ओपन युगात केवळ तीन महिला खेळाडू अशा आहेत की ज्यांनी अव्वल मानांकित खेळाडूंना नमवून जेतेपदावर मोहोर उमटविली आहे. पिलिसकोवा ही देखील या श्रेणीत येण्यास इच्छूक असेल. व्हीनस विलियम्स हिने २००० आणि २००५ ला दोनदा ही किमया केली. त्याआधी ॲन्नी जोन्स हिने १९६९ आणि इवोनी गुलागोंगने १९७१ ला अशी कामगिरी केली होती. गुलागोंगने आपले दुसरे विम्बल्डन १९८० ला जिंकले होते. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाची खेळाडू सेंटर कोर्टवर चॅम्पियन बनू शकली नाही. आता बार्टी तब्बल ४१ वर्षानंतर गुलागोंगच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.