मुंबई- राष्ट्रीय स्पर्धेलाही लाजवेल अशा पीळदार सौंदर्यासह सुरू झालेल्या "स्पार्टन मुंबई श्री" जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईची ताकद अवघ्या देशाने पाहिली. पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य गटातील 154 खेळाडू आणि फिटनेस फिजीक खेळाडूंच्या शतकी सहभागामुळे "स्पार्टन मुंबई श्री" पुन्हा एकदा पावरफुल्ल हिट ठरली. आज प्रत्येक गटात मुंबईचे पीळदार भवितव्य उतरल्यामुळे प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी खेळाडूंना प्रचंड संघर्ष करावा लागला. शरीरसौष्ठवाच्या एकंदर नऊ गटातून अंतिम फेरीसाठी 51 खेळाडूंची निवड केली असली तरी 'स्पार्टन मुंबई श्री"चा फैसला भास्कर कांबळे, सुशील मुरकर, निलेश दगडे, दिपक तांबीटकर, उमेश गुप्ता आणि नवा चेहरा असलेल्या रसेल दिब्रिटो यांच्यातच रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अंधेरीचे सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लब हे स्पार्टन मुंबई श्री निमित्ताने शरीरसौष्ठवाच्या आखीवरेखीव आणि पीळदार स्नायूंच्या देहांनी फुलून निघाले होते. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने पुन्हा एकदा "स्पार्टन मुंबई श्री"चं दिमाखदार आणि ग्लॅमरस सोहळा आयोजित करून आपल्या खेळाची ताकद दाखवून दिली. स्पर्धेला नेहमीप्रमाणे पामी उपस्थिती लाभल्याने आयोजकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. स्पार्टन मुंबई श्रीने आज देखण्या आयोजनाचा आणि स्पर्धकांच्या पामी उपस्थितीचा एव्हरेस्ट सर केला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी अभिमानाने सांगितले.
आज झालेल्या प्राथमिक फेरीत प्रत्येक गटातून अव्वल सहा खेळाडूंची निवड करताना जजेसचा अक्षरश: घामटा निघाला. 55 किलो वजनी गटातून ओंकार आंबोवकर, अजिंक्य पवार, नितीन शिगवण, राजेश तारवे या कसदार खेळाडूंपैकी कोण अव्वल ठरेल हे सांगणे कठिण आहे. 60 किलो वजनी गटात अरूण पाटील, प्रीतेश गमरे, देवचंद गावडेपैकी एक जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरू शकतो. "छोटा बॉम्ब" म्हणून प्रसिद्ध असलेला उमेश गुप्ता 65 किलो वजनी गटात धमाका करणार हे स्पष्ट आहेच, पण त्याचे पीळदार स्नायू "स्पार्टन मुंबई श्री"च्या लढतीतही स्फोट घडवू शकतात, असा अंदाज शरीरसौष्ठव तज्ञच वर्तवत आहेत. स्पर्धेतला सर्वात गर्दीचा गट म्हणजे 70 किलो वजनी गट. सर्वाधिक 37 खेळाडू याच गटात होते आणि यातून सहा खेळाडू निवडताना जजेसना आपले कौशल्य पणाला लावावे लागले. या गटात मनोज मोरे, संतोष भरणकर, चिंतन दादरकर, आदित्य झगडेसारखे आपला जोर दाखवतील. 75 किलो वजनी गटात भास्कर कांबळे आपले जेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वोत्तम तयारीत दिसला. त्यामुळे तो उद्या अंतिम फेरीत सुजीत महापात्रा, रोहन गुरव, विशाल धावडे यांना सहज मागे टाकेल, यात तीळमात्र शंका नाही. सुशील मुरकरसमोर कडवे आव्हान
गतवेळचा हॉट फेव्हरेट सुशील मुरकरला आपल्या 80 किलो वजनी गटात कडवे आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सुशांत रांजणकर, अभिषेक खेडेकर, स्वप्निल मांडवकर, गणेश पेडामकरसारखे एकापेक्षा एक असे खेळाडू असल्यामुळे सुशील मुरकरला अंतिम फेरीत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागणार आहे. 85 किलो वजनी गटात दिपक तांबिटकरलाही अव्वल स्थान मिळविताना झगडावे लागणार आहे. या गटात नितीन कोळी, कुमार पेडणेकर, सकिंदर सिगसारखे खेळाडू आहेत. 90 किलो वजनी गटात नवख्या रसेल दिब्रिटोची देहयष्टी पाहून सारेच चक्रावले आहेत. फारच कमी स्पर्धेत दिसलेला रसेल पूर्ण जोशात स्पार्टन मुंबई श्रीसाठी उतरल्यामुळे स्पर्धेत चुरस वाढली आहे. तो गटातून अव्वल आला तरी कुणाला याचे आश्चर्य वाटणार नाही. तसेच सर्वात वजनदार गटात निलेश दगडेचे अव्वल स्थान अबाधित राहिल,असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाचा 'स्पार्टन मुंबई श्री"चा विजेता छोटा बॉम्ब ठरतोय की नवखा खेळाडू बाजी मारतो की अनुभवी तारे चमकणार. थोडी प्रतीक्षा करा. शनिवारी रात्री कळेलच.