एलिमिनेटर : कोलकाताविरुद्ध हैदराबाद लढत रंगणारबेंगळुरू : दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) आयपीएलच्या दहाव्या पर्वात बुधवारी एलिमिनेटरमध्ये गत चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. केकेआर संघ पराभवाचे दुष्टचक्र भेदण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीतील विजेत्या संघाला मुंबई-पुणे संघांदरम्यानच्या पहिल्या क्वालीफायरमधील पराभूत संघासोबत १९ मे रोजी लढत द्यावी लागेल. या लढतीनंतर अंतिम फेरी गाठणारा दुसरा संघ निश्चित होईल. केकेआर संघाने यंदाच्या मोसमातील दुसऱ्या टप्पात सातपैकी चार सामने गमावले आहेत. शाहरुख खानच्या मालकीचा संघ सुरुवातीला मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती करण्यास प्रयत्नशील आहे. मॅच विनर ख्रिस लिनला सूर गवसेल, अशी केकेआर संघाला आशा आहे. लिनने गेल्या महिन्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये २१ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची खेळी केली होती. त्याने कर्णधार गंभीरच्या साथीने गुजरात लायन्सविरुद्ध सलामी लढतीत १८४ धावांची भागीदारी करताना नाबाद ९३ धावा केल्या होत्या. केकेआर संघाला सुनील नरेनकडूनही चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध संघाला शानदार सुरुवात करून दिली होती. त्या लढतीत त्याने १५ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकताना आयपीएलमधील सर्वांत वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी साधली होती. केकेआर संघात मनीष पांडे व रॉबिन उथप्पा या फलंदाजांचाही समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे ३९६ व ३८६ धावा फटकावल्या आहेत. गंभीर सुरुवातीला शानदार फॉर्मात होता, पण त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याने आतापर्यंत यंदाच्या मोसमात ४५४ धावा फटकावल्या आहे. त्याला पुन्हा सूर गवसेल अशी केकेआर व्यवस्थापनाला आशा आहे. गोलंदाजीमध्ये ख्रिस व्होक्स (१७ बळी) आणि उमेश यादव (१४ बळी) चांगली कामगिरी करीत आहेत. त्यांच्यापुढे डेव्हिड वॉर्नर अँड कंपनीला रोखण्याचे कडवे आव्हान राहणार आहे. गत चॅम्पियन सनरायजर्स संघाने १४ पैकी ८ सामन्यांत विजय मिळवला आहे तर पाच सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. (वृत्तसंस्था)- आयपीएलची शेवटच्या टप्प्यातील रंगत आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीची उत्सुकता.. यासाठी आज ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांचा खास ‘लाईव्ह चॅट’ दुपारी 3.30 वाजता
कोण सरशी साधणार ?
By admin | Published: May 17, 2017 4:14 AM