मुंबईः रशियात भरलेल्या फुटबॉलच्या महाकुंभमेळ्यात रविवारी रात्री 'फ्रेंच क्रांती' घडली. फ्रान्सनं दुसऱ्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली, तर उपविजेत्या क्रोएशियानंही जगाचं मन जिंकलं. १९९१ मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या, ४०-४२ लाख लोकसंख्येच्या देशानं अर्जेंटिना-इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना धूळ चार अंतिम फेरीत धडक मारली होती आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. त्यांचं वर्ल्ड कप स्वप्न भंगलं खरं, पण या कामगिरीने त्यांना निश्चितच प्रचंड आत्मविश्वास दिलाय, नवं बळ दिलंय.
क्रोएशियाच्या या गरुडभरारीनंतर, १ अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेला आपला भारत फुटबॉलमध्ये पिछाडीवर का, असा प्रश्न अनेकांना पडणं स्वाभाविकच आहे. त्याचं मजेशीर, पण त्यापेक्षाही मार्मिक उत्तर व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालंय. राजकारणाचा खेळ आणि खेळाचं राजकारण झाल्यानंच आपल्याकडे सगळ्या खेळांचा खेळखंडोबा झाला आहे, असं खेदजनक वास्तव या मेसेजमधून पुन्हा समोर आलंय.
अर्थात, हे काही आत्ताचं चित्र नाही. प्रत्येक वेळी राष्ट्रकुल किंवा ऑलिम्पिक स्पर्धेनंतर या विषयावरून गहन चर्चा होते. नवे खेळाडू तयार व्हावेत, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी समित्याही स्थापन होतात. पण या समित्यांचे प्रमुख बऱ्याचदा राजकारणीच असतात. त्यामुळे, राजकारणातील विस्थापितांचं पुनर्वसन करण्यासाठीच या समित्या स्थापन होतात की काय, अशी शंका येते. सुदैवाने, देशाचे क्रीडामंत्री हे ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू आहेत. हाच पायंडा सर्वत्र पडत नाही, तोवर जागतिक क्रीडाक्षेत्रात भारताचा झेंडा उंच फडकणं कठीणच आहे.
भारतीय बॅडमिंटन संघटनाः आसाममधील मंत्री हिमांतो बिस्वा सर्मा अध्यक्षपदी. आसाम क्रिकेटचेही अध्यक्ष तेच आहेत.
भारतीय टेनिस असोसिएशनः सनदी अधिकारी प्रवीण महाजन यांच्याकडे अध्यक्षपद. महसूल खात्यात होत्या कार्यरत. भारतीय मुष्टियोद्धा संघटनाः बॉक्सिंगचा अनुभव नसलेले अजय सिंग अध्यक्ष