ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - क्रिकेटच्या खेळामध्ये दैवत्व मिळालेला भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी १५ नोव्हेंबर १९८९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर १६ वर्षांचा शाळकरी सचिन फलंदाजीला उतरला तेव्हा क्रिकेटमध्ये हा मुलगा एकदिवस दैवत्व मिळेल अशी कोणी कल्पनाही केली नसेल.
पहिल्या कसोटीतच सचिनला पाकिस्तानच्या आग ओकणा-या गोलंदाजीचा तोपखान्याला सामोरे जावे लागले. इमरान खान, वसिम अक्रम, अब्दुल कादीर असे एकाहून एक सरस भेदक गोलंदाज समोर होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानने ४०९ धावा केल्या. भारताचा पहिला डाव २६२ धावांवर आटोपला.
सचिनने पहिल्या कसोटी विशेष अशी कामगिरी केली नाही. सचिन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला तेव्हा भारताची ४ बाद ४१ अशी स्थिती होती. २४ चेंडूंचा सामना करताना सचिनने अवघ्या १५ धावा केल्या. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. पदार्पणाच्या कसोटीत सचिनला वकास युनूसने बाद केले. त्याचा सुद्धा हा पदार्पणाचा कसोटी सामना होता.
पुढे जाऊन दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी ख्याती मिळवली. २४ वर्षाच्या यशस्वी करीयरनंतर सचिन निवृत्त झाला त्यावेळी ५३.७८ च्या त्याने १५,९२१ धावा केल्या. यात ५१ शतके आणि ६८ अर्धशतके त्याच्या नावावर जमा होती.