मेरी कोम : बॉक्सर्स तयार करणार- महेश चेमटे, मुंबई .आजही मी तिरंगा खांद्यावर घेऊन रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी उत्सुक असून, वाइल्ड कार्डसाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे. मात्र रिओ आॅलिम्पिकसाठी निवड न झाल्यास, माझ्यासमोर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे स्पष्ट मत आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोमने मांडले.मुंबईतील अंधेरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात मेरीने ‘लोकमत’शी संवाद साधला. या वेळी तिने भारतीय बॉक्सिंग महासंघाचा वाद, रिओ आॅलिम्पिक अशा विषयांवर आपले मत मांडले. ‘‘जागतिक स्पर्धेत मी दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली. मी पूर्ण ताकदीने खेळली होती आणि माझा खेळही चांगला झाला होता. माझ्या कामगिरीवर मी संतुष्ट होती, मात्र खेळात हार-जीत होते. खेळाडू म्हणून पंचाच्या निर्णयाचा मला आदर आहे. त्या पराभवामुळे मी निराश झाले असली, तरी एकूण कामगिरीवर मी समाधानी आहे,’’ असे मेरीने सांगितले.सध्या वादात अडकलेल्या भारतीय बॉक्सिंग संघटनेविषयी मेरी म्हणाली, ‘‘भारतीय संघटनेला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. खेळाची संघटना ही त्या खेळाचे कुटुंब असते. नेमकी तीच कमतरता संघटनेमध्ये आहे. याचा खेळावर आणि खेळाडूंवर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे वेळीच योग्य ते बदल झाले पाहिजेत.’’ तसेच, रिओ आॅलिम्पिकसाठी शिवा थापा या एकमेव भारतीय बॉक्सरने पात्रता मिळवली असून, त्याला माझ्याकडून शुभेच्छा आहे. मीही देवाकडे माझ्या वाइल्ड कार्डसाठी प्रार्थना करीत असून, ही संधी मिळाल्यास पुन्हा एकदा मी भारतासाठी नक्कीच अभिमानस्पद कामगिरी करेन, असा विश्वासही मेरीने या वेळी व्यक्त केला. ‘‘भारतीय आॅलिम्पिक संघटना माझ्या वाईल्ड कार्डसाठी सातत्याने पाठपुरावा करत असून, मी त्यांची ऋणी आहे. नेहमीप्रमाणे माझा खडतर सराव सुरू असून, आॅलिम्पिक प्रवेश मिळेल की नाही, ही भीती कायम मनात असते. परिणामी सध्या मी द्विधा मनस्थितीत अडकली आहे,’’ असेही मेरी म्हणाली.देशात जास्तीत जास्त तरुणांनी बॉक्सिंगमध्ये यश मिळवावे, त्यासाठी मी बॉक्सिंग अकादमी सुरू करणार असून, युवांना बॉक्सिंगचे धडे देण्यात येतील. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही त्याच ठिकाणी करण्यात येईल. तूर्तास तरी माझे संपूर्ण लक्ष आॅलिम्पिकच्या प्रवेशाकडे आहे.- मेरी कोम
...तर निवृत्ती जाहीर करणार !
By admin | Published: June 17, 2016 5:31 AM