नवी दिल्ली : २०१६ च्या रियो आॅलिंपिकच्या एक वर्ष आधीच प्रोफेशनल बॉक्सिंग खेळण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेणारा भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंद्रसिंह याने आपला निर्णय चुकीचा नसल्याचे स्पष्ट केले, तसेच त्याने प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना नवीन ओळख निर्माण करणार, असे मत व्यक्त केले.विजेंद्रने २००८ च्या बीजिंग आॅलिंपिकमध्ये कास्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. तो म्हणाला, ‘‘मी प्रोफेशनल बॉक्सर बनून उत्साहित आहे. माझे स्वप्न आॅलिंपिकमध्ये पदक जिंकणे हे होते आणि २००८ मध्ये मी हे स्वप्न साकार केले. मी प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी कठोर परिश्रम घेईन.’’२९ वर्षीय विजेंद्रने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘अनेक लोक काही माहिती नसताना काहीही बोलतात. मी काही चुकीचा निर्णय घेतला, असे मला वाटत नाही. मी फ्लाएड मेवेदर आणि मॅनी पॅकियाओ यांच्या दर्जापर्यंत पोहोचू इच्छितो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मी अजूनही भारताचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे. देशाप्रती माझी प्रामाणिकता कमी झालेली नाही.’’विजेंद्रने भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिताना गेल्या महिन्यात आयओएस स्पोर्टस् अँड एंटरटेन्मेंटद्वारे क्कींस बॅरी प्रमोशन्ससोबत सोमवारी अनेक वर्षांचा करार केला. त्यानुसार हा मिडलवेट मुष्टियोद्धा आपल्या पहिल्या वर्षी कमीत कमी ६ लढती खेळणार आहे.
प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये भारताची नवीन ओळख निर्माण करणार : विजेंद्र
By admin | Published: July 13, 2015 12:40 AM