हैदराबाद : दुष्काळ हा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करून दुष्काळाचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल माजी कसोटीपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण याने विचारला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळामुळे येथील आयपीएल सामने स्थानांतरित करावे, अशी मागणी होत आहे, न्यायालयानेही हा प्रश्न गंभीरतेने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण पत्रकारांशी बोलत होता.लक्ष्मण म्हणाला, सामन्यांचे ठिकाण बदलणे हे या समस्येचे समाधान नाही, आपणाला या समस्येच्या मुळापर्यंत जावे लागेल. यंदा मान्सून चांगला झाला नाही, ही एका राज्याची नाही तर संपूर्ण देशाची समस्या आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हे झाले आहे. दुष्काळाच्या झळा जाणवणार नाहीत, यासाठी संबंधित विभागाने काम करायला हवे. मुंबईतून सामने हलवणे हा त्यावरचा उपाय नाही.लक्ष्मण पुढे म्हणाला, देशातील शेतकऱ्यांसाठी माझी सहानुभूती आहे. परंतु सगळेजण आयपीएलमध्ये दोष शोधत आहे. आयपीएलचे फायदे कोण लक्षात घेत नाही. देशातील युवा क्रिकेटपटूसाठी हे चांगले व्यासपीठ असून, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होतो. देशातील शेतकऱ्यांसाठी क्रिकेटविश्वाने मदत करावी, अशी सचिनची इच्छा आहे. त्याच्याकडे मोठी योजना आहे, मला विश्वास आहे की, लवकरच यादृष्टीने भरीव काहीतरी घडेल.
सामने स्थानांतरित करून दुष्काळ हटणार का?
By admin | Published: April 08, 2016 3:16 AM