ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 1 - गहुंजे मैदानावर थोड्याच वेळात आयपीएलच्या दहाव्या सत्रातील गुजरात लायन्स विरुद्ध पुणे सुपरजायटंस हा सामना सुरू होत आहे. या सामन्यातील विजयानंतर पुणे संघाच्या प्ले आॅफच्या आशांना बळ मिळेल तर गुजरात लायन्सही मुंबई विरोधातील सुपर ओव्हरमधील पराभव विसरून गुणतक्त्यात आपले स्थान वर करण्यासाठी उत्सुक असेल. पुण्याने मागच्या पाच सामन्यातील चार सामन्यात विजय मिळवून गुणतक्त्यात चौथे स्थान पटकावले आहे. हे स्थान कायम राखण्यासाठी पुण्याला विजय गरजेचा आहे.या सत्रात पुण्याने पहिल्या सामन्यात मुंबईवर विजय मिळवला. मात्र त्यानंतर पुणे संघाच्या मागे पराभवाचे शुक्लकाष्ठ लागले. अखेर महेंद्र सिंह धोनीने सनरायजर्स विरोधात संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर पुण्याची विजयी घोडदौड कायम राहिली आहे. हीच कामगिरी संघाला पुन्हा करावी लागेल.फलंदाजी हे पुण्याचे बलस्थान आहे. अजिंक्य रहाणे, युवा राहूल त्रिपाठी, मनोज तिवारी, कर्णधार स्मिथ, महेंद्रसिंह धोनी हे पुण्याच्या विजयात नेहमीच महत्त्वाचे शिलेदार ठरले. अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठी हे संघाला उत्तम सुरुवात करून देण्यात अपवाद वगळता यशस्वी ठरले आहेत. राहुल त्रिपाठी स्थिर झाल्यावर फटकेबाजी करून धावसंख्येला आकार देतो. त्याशिवाय अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि तिवारी दमदार फटकेबाजी करून प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठे लक्ष्य ठेऊ शकतात.गुजरात लायन्सकडे फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांची मोठी यादी आहे. पुणे संघाला अरॉन फिंच, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, ब्रेंडन मॅकक्युलम यांच्यापासून सावध रहावे लागेल. या खेळाडूंसाठी विशेष रणनीती देखील आखावी लागेल. युवा इशान किशनने देखील मुंबई विरोधातील सामन्यात चांगलेच प्रभावित केले होते. किशनच्या रुपाने गुजरातला चांगला सलामीवीर लाभू शकतो. जेम्स फॉकनर आणि बसील थम्पी यांची भेदक गोलंदाजी पुणे संघाला त्रस्त करू शकते. आता त्यांच्या जोडीला अनुभवी इरफान पठाण देखील आहे. मात्र मागच्या सामन्यात त्याची कामगिरी समाधानकारक नव्हती. इम्रान ताहीर हे पुण्याच्या गोलंदाजीचे मुख्य अस्त्र आहे. त्यासोबतच जयदेव उनाडकट आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील अखेरच्या काही षटकांमध्ये लायन्सच्या फटकेबाजीला आळा घालू शकतात. आरसीबी विरोधातील सामन्यात इम्रान, जयदेव आणि सुंदर यांनी केलेली कामगिरी गुजरात लायन्सला नजरेआड करता येऊ शकत नाही.